मुंबई : मुंबई उत्तर मतदारसंघाची मतमोजणी गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे पार पडली. सकाळी सुरळीतपणे मतमोजणी सुरू होती. मात्र, काही तांत्रिक बिघाडामुळे निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची माहिती मिळण्यास उशीर झाला. त्यामुळे केंद्राबाहेर काहीकाळ कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला होता. गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्व या मतदारसंघाची मतमोजणी झाली.
सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडत असताना मोजणी केंद्रातून मुंबई उत्तर मतदारसंघाचा फेरीनिहाय निकाल दिवसाअखेर ही वेळेवर मिळू शकला नाही. इतर मतदारसंघाची माहिती मात्र वेळेवर उपलब्ध होत झाली. फेरीनिहाय निकाल घोषित होत होता तशी कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. आपला पक्ष आणि उमेदवार यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि पाठिंबा दर्शविण्यासाठी समर्थक व कार्यकर्त्यांनी सायंकाळच्या वेळी गर्दी केली. उत्तर पश्चिम मतदारसंघातील अमोल कीर्तिकर यांचा निकाल घोषित झाल्यांनतर उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
१) मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी अचानक मतमोजणीच्या आदल्या दिवशी आजारी पडल्याने ते मंगळवारी मतमोजणी केंद्रावर अनुपस्थित होते.
२) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी होऊ शकत नसल्यामुळे ही आकडेवारी अधिकृतपणे जाहीर केली नव्हती. त्यावर विचारविनिमय केल्यानंतर दुपारनंतर ही आकडेवारी जारी करण्यास सुरुवात झाली.
३) त्यातही प्रत्येक फेरीनंतरची आकडेवारी विनास्वाक्षरी असलेल्या कागदपत्रांवर येत होती. त्यामुळे महायुतीचे भाजपचे एकमेव उमेदवार भरघोस मतांनी आघाडीवर असतानाही त्यांच्या मतांची आकडेवारी अधिकृतपणे जाहीर होत नव्हती.