Join us

मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 2:44 PM

loksabha Election - मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून महायुतीकडून रवींद्र वायकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याशी होणार आहे. 

मुंबई - Ravindra vaikar on Amol Kirtikar ( Marathi News ) मी नवखा उमेदवार नाही, वायकर म्हणजे काम हा ब्रँड आहे. मी संसदेत पहिल्या बाकावर बसेन असा विश्वास महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी व्यक्त केला आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेकडून वायकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

रवींद्र वायकर म्हणाले की, नवीन उमेदवाराला प्रचाराला वेळ द्यावा लागतो, मी २० वर्ष नगरसेवक होतो. त्यात शिक्षण समिती, त्यातून केलेली कामे, स्थायी समितीतून कामे केली आहे. जोगेश्वरीला ट्रॉमा सेंटर उभारलं आहे. मेडिकल कॉलेजसाठी पाठपुरावा केला आहे. माझ्या काळात तोट्यात असलेली महापालिका मी नफ्यात आणली. पहिल्यांदाच ४ टर्म मला स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळालं. मी सतत काम करत गेलो. २० हजार कोटी नफ्यात महापालिका आणली. या कामाचं कौतुक अनेकांनी केले. विधानसभेतही मी बॅटिंग केली आहे. उच्च शिक्षणापासून सर्व खात्यात मी काम केले आहे. वायकर म्हणजे काम असा हा ब्रँड आहे. ४ वेळा नगरसेवक आणि ३ वेळा आमदार आहे. माझा प्रचार ३५ वर्ष सुरू आहे. माझी बँकग्राऊंड लोकांना माहिती आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहे. मी ५० वर्षापासून शिवसेनेत आहे. १९७४ पासून आतापर्यंत माझी कारकिर्द आहे. शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. राजकारणात बदल होत असतो, बदल कोण काय घडवेल माहिती नाही. बदल हा विधीलिखित असतो. दिल्ली हे स्वप्न माझं नव्हतं, मला महाराष्ट्रात काम करायचं होते, पण भाग्यविधाता आपल्या आयुष्यात काय घडवतो ते चांगलेच घडवतो. कायद्याने खरी शिवसेना धनुष्यबाण कोणाकडे हे सगळ्यांना माहिती आहे असंही वायकर यांनी म्हटलं. 

दरम्यान, ज्यावेळी युद्धात उतरलो तेव्हा जिंकण्याच्या उद्देशाने उतरायचं असते, केलेल्या कामातून लोक मतदान करतात. लोकसभेत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणे, मुंबईसाठी काहीतरी आणणारा प्रतिनिधी म्हणून मी संसदेत काम करेन. भाजपाच्या साथीने मी संसदेत असेन, मी दबावाला भीक घातली नाही. मी कोर्टालाही सामोरे गेले आहे. माझ्यावर कुठलाही आरोप नाही असंही स्पष्टीकरण वायकरांनी दिले आहे. 

टॅग्स :मुंबई उत्तर पश्चिमलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४रवींद्र वायकरशिवसेनालोकसभा निवडणुक रणांगण २०२४