Join us

मुंबईत रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:07 AM

मुंबई : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या सात हजारांच्या घरात नोंद झाली आहे. मुंबईत रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्यानंतर ...

मुंबई : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या सात हजारांच्या घरात नोंद झाली आहे. मुंबईत रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्यानंतर रुग्णसंख्येचा आलेखही काहीसा घसरत असल्याचे चित्र आहे. मुंबईकरांसाठी आणखी दिलासादायक बाब म्हणजे, दिवसभरातील रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. मंगळवारी सात हजार २१४ रुग्ण आणि ३५ मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात नऊ हजार ६४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण चार लाख ९६ हजार २६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण संख्या पाच लाख ९३ हजार ९०६ झाली असून, मृतांचा आकडा १२ हजार ४३९ इतका आहे. सध्या मुंबईत ८३ हजार ९३४ रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात ४५ हजार ३५० चाचण्या तर आतापर्यंत मुंबईत ५० लाख २७ हजार ८८२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या १०५ आहे, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या एक हजार १४१ आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८४ टक्के झाला असून, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४७ दिवसांवर आहे. १३ ते १९ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.४४ टक्के असल्याची नोंद आहे.