Coronavirus In Mumbai : गेल्या काही दिवसांपासून कमी होत असणारी कोरोनाबाधितांची संख्या (Coronavirus Patients) मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळून येत आहेत. दरम्यान मुंबई कोरोना विषाणूच्या त्सुनामीचाही सामना करण्यास तयार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटमुळे असं होत असल्याचं मानलं जातंय, असंही त्या म्हणाल्या.
आठवड्याभरापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख (WHO) टेड्रोस घेब्रेयसिस यांनी ओमायक्रॉनमुळे (Omicron) रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढेल असा इशारा दिला होता. "ओमायक्रॉन हा अधिक प्रसार होणारा विषाणू आहे आणि डेल्टा प्रमाणे या विषाणूमुळेही रुग्णसंख्येची त्सुनामी येईल," असंही ते म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबईत वाढणाऱ्या रुग्णसंख्येबद्दल प्रश्न विचारण्यात आला. "आम्ही तिसऱ्या लाटेसाठी तयार आहोत.
आमच्याकडे लिक्विड ऑक्सिजन प्लांट्स आहेत. रुग्णालयांतील बेड्सशिवाय ३० हजार बेड्स आहे, याशिवाय जंबो कोविड सेंटर्सही तयार आहेत. आम्ही कोरोनाच्या त्सुनामीशीही लढू शकतो," असं त्या म्हणाल्या. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
"... तर लॉकडाऊनवर विचार""गरज भासल्यास अजून कठोर पावलं उचलली जातील. जर मुंबईत दररोज २० हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या दिसून आली तर यावर विचार केला जाईल. लोक मार्गदर्शक सूचनांचं पालन करत नाहीत. आजही अनेक जण मास्क घालत नाही. जे नागरिक आहेत, त्यांना आपली जबाबदारी समजून घ्यावी लागेल. मुंबईत ९ वीपर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. आमचे मेडिकल सेंटर्स, हॉस्पीटल्स तयार आहेत," असंही त्या म्हणाल्या.
"चिंतेचा विषय""मुंबईत कलम १४४ लागू आहे. ३-४ पट रुग्णसंख्या वाढत आहे, हा चिंतेचा विषय आहे. आम्ही लोकांच्या घरी जाऊन लसीकरण केलं आहे. अनेक लोक भीती, धार्मिक कारणांमुळे लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. लसीकरण हे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सर्व ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था केली आहे," असंही महापौर म्हणाल्या.
'... तर मिनी लॉकडाऊन'"आजही अनेक जण कोविड प्रोटोकॉलचं पालन करत नाहीत. अशातच जर रुग्णसंख्या २० हजारांपेक्षा अधिक आली, तर मिनी लॉकडाऊनचा विचार करावा लागेल. यात अनेक निर्बंध घालावे लागलेत. आज कोणालाही लॉकडाऊन नकोय. लोकांनी आपली जबाबदारी समजून घ्यावी. लोकांनी घाबरू नये पण काळजी घ्यावी," असंही त्यांनी स्पष्ट केलं.