१० डिसेंबरला ताडदेव येथील कोळी महिलांचा डी विभाग कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा
By मनोहर कुंभेजकर | Published: December 3, 2024 02:56 PM2024-12-03T14:56:29+5:302024-12-03T14:59:11+5:30
Mumbai News: ताडदेव येथील कोळी महिलांना न्याय मिळण्यासाठी पालिकेच्या डी विभाग कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा येत्या दि, १० डिसेंबर रोजी आयोजित केला आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - ताडदेव येथील कोळी महिलांना न्याय मिळण्यासाठी पालिकेच्या डी विभाग कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा येत्या दि, १० डिसेंबर रोजी आयोजित केला आहे. ताडदेव येथील बेलेसिस ब्रीजच्या नुतनीकरणामुळे शेकडो वर्षापूर्वी पासून मासेमारी व्यवसाय करणाऱ्या मासे विक्रेत्या कोळी महिलांवर बृहन्मुंबई महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांकडून होऊ घातलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बेलासिस ब्रीज ते डी वार्ड कार्यालयावर मच्छिमार जन-आक्रोश मोर्चा धडकणार असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी दिली.
कष्टकरी, गरीब, विधवा, हातावर पोट घेऊन जगणारे आणि साठ वर्षांपूर्वी पासून ताडदेव येथील बेलासिस ब्रीज लगत सक्षम व्यवसाय करणारे मासे विक्रेत्या कोळी महिलांना कायमचे उद्ध्वस्त करण्याचा डाव मनपा कडून होत असल्याचा आरोप मच्छिमार समितीकडून करण्यात आला आहे. भारतीय संविधानातील परिशिष्ट २१ मध्ये भारतीय नागरिकांना आपली उपजिवीका करण्याचा अधिकार असून कोळी महिलांना कोणतीही नोटीस अथवा योग्य पुनर्वसना संदर्भात कसलेच लेखी पत्र पालिकेकडून न देता सरळ बुलडोझर चडविण्याची कार्यवाही भारतीय संविधानाचे उल्लंघन असल्याने भारतीय संविधानाच्या परिशिष्ट १९(१)(अ) आणि १९(१)(ब) च्या अधिकारांचा वापर करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मच्छिमार जन आक्रोश मोर्चा डी विभाग कार्यालयावर धडक देणार असल्याचे तांडेल यांनी सांगितले.
१३३ वर्षांपूर्वी इंग्रजांनी बांधलेल्या ताडदेव आणि मुंबई सेंट्रलला जोडणारा बेलासिस ब्रीज आहे.यावंब्रीजला लागून आपल्या कोळी भगिनी शकेडो वर्षांपासून मासे विक्री करण्याचा पिढीजात व्यवसाय करीत आले आहेत. मासे विक्री गाळ्याबरोबर या ब्रीज वर इतर दुकाने सुद्धा होती. महानगर पालिकेने इतर दुकानदारांचे पुनर्वसन करून त्यांची दुकाने तोडली परंतू आपल्या कोळी भगिनींना कसलेच लेखी स्वरुपात पुनर्वसन अथवा नोटीस न देता गाळे तोडण्याची धमकी तसेच महिलांना नसताना त्यांच शौचालय तोडण्यात आल्याने मच्छिमार समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.या दमदाटी आणि चुकीच्या कारवाईमुळे मनपा च्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आल्याचे समिती कडून सांगण्यात आले.
काय आहेत मासे विक्रेत्या कोळी महिलांच्या मागण्या
बेलाईस ब्रीज लगत मासळी विक्री करणाऱ्या कोळी महिलांचे पुनर्वसन ताडदेव परिसरात करण्यात यावे.
जो पर्यंत महीलांचे पुनर्वसन होत नाही तो पर्यंत महिलांचे गाळे शाबूत ठेवण्यात यावेत.
तोडलेल्या शौचालयाच्या ठिकाणी पोर्टेबल शौचालय गाडीची व्यवस्था करण्यात यावी.
बेलाईसीस ब्रीज च्या बाजूला बांधण्यात आलेली 'द ग्रेट इस्टेट रॉयल' गृह निर्माण संस्थेने महानगर पालिकेच्या मालकीच्या जागेत अतिक्रमण करून तिथे उभे केलेले बेकायदेशीर उद्यान तोडून ती जागा ताब्यात घेण्यात यावी.