Join us  

Mumbai: म्हाडाच्या ३,५१५ विजेत्या अर्जदारांना ऑनलाईन तात्पुरते देकार पत्र जारी  

By सचिन लुंगसे | Published: September 04, 2023 6:50 PM

Mumbai: ४०८२ सदनिकांच्या संगणकीय सोडतीतील स्वीकृती पत्र सादर केलेल्या ३५३३ पैकी ३५१५ विजेत्या अर्जदारांना आज एका क्लिकवर एकाचवेळी सदनिकेची विक्री किंमत भरण्यासंदर्भातील ऑनलाईन तात्पुरते देकार  पत्र 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते पाठविण्यात आले.

मुंबईम्हाडाच्यामुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे नुकत्याच जाहीर ४०८२ सदनिकांच्या संगणकीय सोडतीतील स्वीकृती पत्र सादर केलेल्या ३५३३ पैकी ३५१५ विजेत्या अर्जदारांना आज एका क्लिकवर एकाचवेळी सदनिकेची विक्री किंमत भरण्यासंदर्भातील ऑनलाईन तात्पुरते देकार  पत्र 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते पाठविण्यात आले.

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात बोलतांना जयस्वाल यांनी सदनिका विक्री सोडत प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा आणण्यासाठी नवीन संगणकीय सोडत प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता मुंबई मंडळाचे आणि संगणक कक्षाचे कौतुक केले. मुंबई मंडळाच्या सन २०१३ पासून आजतागायत झालेल्या सोडतीत सोडत जाहीर होणे ते अर्जदारास प्रथम सूचना पत्र (First Intimation Letter) देणे, तात्पुरते देकार पत्र देणे या प्रक्रियेला ०९ महीने ते दीड वर्षांचा कालावधी लागायचा. मात्र, मानवी हस्तक्षेपशिवाय कार्यान्वित Integrated Housing Lottery Management System (IHLMS 2.0) प्रणालीच्या माध्यमातून केवळ २१ दिवसांतच अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविण्याची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. तसेच मुंबई मंडळाच्या या तत्पर आणि पारदर्शक कार्यप्रणालीमुळे नागरिकांना म्हाडाच्या लोकाभिमुख, सुलभ, पारदर्शक, विश्वासार्ह कारभाराची नक्कीच प्रचिती आली असेल, असा विश्वास श्री. जयस्वाल यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, सहमुख्य अधिकारी नीलिमा धायगुडे, उपमुख्य अधिकारी राजेंद्र गायकवाड, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके, मुख्य लेखाधिकारी एम. जे. रोड्रिक्स आदी उपस्थित होते.

जयस्वाल यांनी याप्रसंगी सर्व यशस्वी अर्जदारांना शुभेच्छा देत आवाहन केले की, आज तात्पुरते देकार पत्र मिळाले आहे याच माध्यमातून त्यांना प्राप्त झालेल्या सदनिकेची रक्कम भरण्याचे विकल्प या संगणकीय प्रणालीद्वारे उपलब्ध झाले आहेत. करिता देकार पत्रामध्ये नमूद माहितीचे अवलोकन करून अर्जदार लाभार्थ्यांनी सदनिकेची रक्कम भरल्यास त्यांना लवकरात लवकर हक्काच्या घराचा ताबा मिळू शकणार आहे. सोडतीतील विजेत्या अर्जदारांनी सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा करण्यासाठी एकूण १९५ दिवसांची मुदत आहे. सदनिकेची रक्कम भरण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. ज्या अर्जदारांना एका टप्प्यात १०० टक्के रक्कम भरावयाची असल्यास त्यांना ४५ दिवसात ती रक्कम भरता येणार आहे.

दुसर्‍या टप्प्यांतर्गत सदनिकेच्या विक्री किंमतीचा २५ टक्के भरणा ४५ दिवसांत तर उर्वरित ७५ टक्के रकमेचा भरणा ६० दिवसांत करायचा आहे. २५ टक्के रक्कम भरण्यासाठी १५ दिवस व उर्वरित ७५ टक्के रक्कम भरण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढही तात्पुरते देकार पत्राद्वारे अर्जदारांना दिली आहे. २५ टक्के रकमेचा भरणा केल्यानंतर उर्वरित ७५ रक्कम उभारण्यासाठी अर्जदारास गृह कर्ज घेण्यासाठी अर्जदारांच्या विनंतीनुसार  मंडळातर्फे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) ऑनलाईन दिले जाणार आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत विजेत्या अर्जदारास म्हाडामध्ये केवळ सदनिकेची चावी घेण्यासाठी यायचे असल्याचे श्री. जयस्वाल यांनी सांगितले.

कार्यक्रमाची प्रस्तावना मंडळाचे उपमुख्य अधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी केली. याप्रसंगी गायकवाड म्हणाले, की नूतन IHLMS 2.0 संगणकीय सोडत प्रणालीच्या माध्यमातून अर्जदारांची पात्रता सोडतीपूर्वीच निश्चित करण्यात आली असल्याने पात्र अर्जदारांचीच संगणकीय सोडत काढण्यात आली. यावर्षी मुंबई मंडळाने दि. १४ ऑगस्ट, २०२३ रोजी सदनिकांची सोडत ऑनलाईन काढल्यानंतर सर्व अर्जदारांना सुमारे १० दिवसांत स्वीकृती पत्र पाठविले. स्वीकृती पत्र स्वीकारलेल्या सर्व अर्जदारांना आज म्हणजे सोडत जाहीर केल्याच्या २१ व्या दिवशी तात्पुरते देकार पत्र (Provisional Offer Letter) ऑनलाईन पाठविण्यात आले आहे.

सोडतीतील अयशस्वी अर्जदारांसाठी अनामत रकमेचा परतावा तात्काळ करण्यात आला आहे. ३९८ अर्जदारांनी त्यांना सोडतीत प्राप्त झालेली सदनिका मंडळाला परत करण्याबाबतचा निर्णय कळविला आहे. यामध्ये प्रामुख्याने असे अर्जदार आहेत ज्यांना सोडतीत एकापेक्षा अधिक सदनिका मिळाल्या आहेत. या अर्जदारांच्या अनामत रकमेचा परतावा तात्काळ केला जाणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. मुंबई मंडळाचे सदनिका सोडतीचे कामकाज ऑनलाईन असल्यामुळे लेखणी विरहित (Penless) झाले आहे, याद्वारे सोडत प्रक्रियेत सहभाग घेणे नागरिकांना सुलभ व सोपे झाले त्यामुळे नागरिकांची होणार्‍या त्रासातून मुक्तता (Painless) झाल्याचे अनुभवास येत आहे, असे गायकवाड यांनी मत व्यक्त केले.

म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गतअंधेरी, जुहु, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारण्यात आलेल्या ४,०८२ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त १,२०,२४४ पात्र अर्जांची संगणकीय सोडत १४ ऑगस्ट, २०२३ रोजी काढण्यात आली. या सोडतीत ०४ सदनिकांसाठी अर्ज न आल्याने ४०७८ विजेत्या अर्जदारांपैकी ३५३३ यशस्वी अर्जदारांचे स्वीकृती पत्र आतापर्यंत मंडळास प्राप्त झाले आहे. ७० यशस्वी अर्जदारांकडून स्वीकृती पत्र मंडळास सादर झालेले नाही. ७७ विजेत्या अर्जदारांनी उत्पन्नाबाबत आक्षेपार्ह माहिती सादर केल्याचे मंडळाच्या निदर्शनास आल्याने त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला असल्याने या अर्जांवरील कार्यवाही प्रलंबित आहे. ३९८ अर्जदारांनी त्यांना सोडतीत प्राप्त झालेली सदनिका मंडळाला परत करण्याबाबतचा निर्णय कळविला आहे. यामध्ये प्रामुख्याने असे अर्जदार आहेत ज्यांना सोडतीत एकापेक्षा अधिक सदनिका मिळाल्या आहेत.

सोडतीत जाहीर ४०८२ सदनिकांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १९४७ सदनिकांचा समावेश होता. प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पातील घरे पहाडी गोरेगाव येथे असून या घरांकरिता २२,४७२ अर्ज प्राप्त झाले. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातील ८४३ सदनिकांसाठी २८,८६२ अर्जप्राप्त झाले. या उत्पन्न गटातील सर्वाधिक अर्ज कन्नमवार नगर विक्रोळी (४१५)  या योजनेकरिता प्राप्त झाले. तसेच अल्प उत्पन्न गटातील १०३४ सदनिकांसाठी ६०,५२२ अर्ज प्राप्त झाले. या उत्पन्न गटात सर्वाधिक अर्ज पहाडी गोरेगांव (४१६) या योजनेकरिता प्राप्त झाले. तर मध्यम उत्पन्न गटातील १३८ सदनिकांसाठी ८३९५ अर्ज प्राप्त झाले. या उत्पन्न गटात सर्वाधिक अर्ज उन्नत नगर गोरेगांव येथील गृहनिर्माण योजनेकरिता आले. उच्च उत्पन्न गटातील १२० सदनिकांसाठी २०६८ अर्ज प्राप्त झाले. सर्वाधिक अर्ज शिंपोली कांदीवली पश्चिम येथील गृहनिर्माण योजनेकरिता प्राप्त झाले.  

तात्पुरते देकार पत्रम्हाडा मुंबई मंडळाने पाठविलेल्या तात्पुरत्या देकार पत्रामध्ये सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा कसा करायचा, त्याचे टप्पे कसे, विक्री किंमत कशी भरायची, सदनिकेचे चटई क्षेत्रफळ, सदनिकेचे ठिकाण, अटी व शर्ती याविषयी तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.   

टॅग्स :म्हाडामुंबई