मुंबई : रमी, पोकर, तीन पत्ती, अंदर-बाहरसारख्या खेळांची सेवा ऑनलाइन माध्यमातून देणाऱ्या वोल्फ ७७७ या कंपनीच्या अहमदाबादस्थित मुख्यालयावर ईडीने छापेमारी केली असून कंपनीने एकूण १५० बँक खात्यांतून १७० कोटी रुपयांचे अवैध व्यवहार केल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही बँक खाती गोठवण्यात आली आहेत. गेल्या २७ मार्च रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. मात्र, त्याचे तपशील शनिवारी जाहीर करण्यात आले.
वोल्फ ७७७ या कंपनीने या ऑनलाइन खेळांसाठी स्वतःची वेबसाइट सुरू केली होती. वेबसाइटला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाला होता. काही पैसे डिपॉझिट केल्यानंतर कंपनीतर्फे खेळ व बेटिंगसाठी विशिष्ट पद्धतीची कॉइन्स ग्राहकांना दिली जात. तसेच, यामध्ये सहभागी होण्यासाठी ग्राहकांना एक युझर नेम व पासवर्ड दिला जात असे. या खेळांच्या माध्यमातून ऑनलाइन जुगारच सुरू होता. त्याद्वारे मोठा पैसा कंपनीला मिळत होता. खेळांच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांसाठी कंपनीने १५० बँक खाती सुरू केली होती.
भलत्याच्याच नावाने बँक खाते...कंपनीची बँक खाती संचालक राकेश आर राजदेव याच्या नावे नव्हे तर आकाश ओझाच्या नावावर होती. मात्र, आकाश ओझा याच्या कागदपत्रांचा गैरवापर करून ही खाती उघडण्यात आल्याचे ईडीच्या तपासात आढळून आले. आपल्या नावे अशी काही बँक खाती असल्याची माहिती आकाशला नव्हती. या प्रकरणी एकूण १७० कोटी ७० लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती ईडीला प्राप्त झाली असून आतापर्यंत ३ कोटी रुपये ईडीने जप्त केले आहेत. आगामी काळात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.