- मनोहर कुंभेजकरमुंबई - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून साहेब प्रतिष्ठान – गोराई या संस्थेच्या वतीने सलग 11 व्या वर्षी बोरिवली पश्चिम “दुर्ग गोराई येथे "दुर्ग बांधणी स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते. चारकोप – सह्याद्री - गोराई – आय सी कॉलनी मधील 21 संस्थानी या स्पर्धेत सहभाग घेतला. वय वर्षे 5 पासून वय वर्षे 75 मधील सर्व आबालवृद्धाचे या दुर्ग बांधणीत योगदान होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक मातोश्री संस्थेच्या प्रतापगडाला मिळाला, द्वितीय क्रमांक प्रतीक संस्थेच्या पद्मदुर्गास तर तृतीय क्रमांक यशोप्रिया संस्थेच्या प्रतापगडास मिळाला. स्नेहपूजन संस्थेच्या विजयदुर्गास, प्रतापगड संस्थेच्या सुवर्ण दुर्गास व ओमसाई दर्शनच्या शिवनेरी किल्ल्यास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या सर्व विजेत्यांना त्यांचे पारितोषिक येत्या रविवार दि, 19 नोव्हेंबर रोजी त्यांच्या संस्थेत जाऊन प्रदान करण्यात येईल. प्रथम क्रमांकास रु 5000/- व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास रु 3000/- व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकास रु 2000/- व आकर्षक चषक तथा उत्तेजनार्थ विजेत्याना आकर्षक चषक प्रदान करण्यात येईल. तत्पूर्वी सहभागाबद्दल सर्व स्पर्धकांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या स्पर्धेचे परीक्षक या नात्याने गेली 27 वर्षे अविरत सह्याद्रीमध्ये भटकंती करणारे, 611 किल्ल्यांची वारी, 7 सुळक्यांचे प्रस्तरारोहण, 200 पेक्षा जास्त गुंफा व पुरातन मंदिरे यांचा अभ्यास केलेल्या जगदीश धानमेहेर यांनी केले. या स्पर्धेसाठी माजी नगरसेविका संध्या दोंशी, शिवसैनिक विपुल दोंशी व बोरिवली विधानसभा संघटक संजय भोसले यांनी सहकार्य केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे स्वप्नील हांदे व ओमकार कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली.