मुंबईत १२ ऑक्टोबरला झालेल्या Blackout मध्ये चीनचा हात, Power Grid वर केला सायबर अटॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 01:31 PM2021-03-01T13:31:22+5:302021-03-01T13:34:21+5:30
Mumbai Power Outage : जर भारतानं अधिक कठोरपणा दाखवला तर संपूर्ण देशाला पॉवर कटचा सामना करावा लागेल असा यामागील संदेश होता असा दावा अहवालातून करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईत झालेल्या पॉवर कटमध्ये चीनचा हात असल्याचा दावा एका अमेरिकन अहवालातून करण्यात आला आहे. या पॉवरकटचा संबंध गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीशी आहे असा दावाही या अहवालातून करण्यात आला आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या झटापटीनंतर LAC वर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. जर भारतानं अधिक कठोरपणा दाखवला तर संपूर्ण देशाला पॉवर कटचा सामना करावा लागेल असा यामागील संदेश होता असा दावा अमेरिकन अहवालातून करण्यात आला आहे. चीननं आपल्या हॅकर्सच्या मदतीनं भारतात ब्लॅकआऊट करण्याच्या तयारीत होता. तसंच भारताला अंधारात ढकलण्याची त्यांची तयारी होती असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या या अहवालात एका अभ्यासाचा हवाला देण्यात आला आहे. चीन हॅकर्सची एका टीमनं ऑक्टोबर महिन्यात केवळ पाच दिवसांमध्ये भारतातील पॉवर ग्रिड, आयडी कंपन्या आणि बॅकिंग सेक्टर्सवर ४०,५०० वेळा सायबर हल्ला केला होता. भारताच्या पॉवर ग्रिडविरोधात एक व्यापक चिनी सायबर मोहीम सुरू करण्यात आल्याचंही या अभ्यासात म्हटलं आहे. जर सीमेवर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली तर चीन भारतातील निरनिराळ्या पॉवर ग्रिडवर मॅलवेअर हल्ला करून त्यांना बंद पाडू शकतो हे दाखवण्याचा त्यामागील प्रयत्न असल्याचंही यात सांगण्यात आलं आहे.
१२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यानं खळबळ माजली होती. तसंच मुंबईतील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर्स चालवण्यासाठीही आपात्कालिन जनरेटर्सची मदत घ्यावी लागली होती. इतकंच नाही तर शेअर मार्केटचं कामकाजही बंद झालं होतं. हे दशकांमधील सर्वात मोठा वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार होता. परंतु २ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला होता.
वीज पुरवठा करणाऱ्या प्रणालीत मॅलवेअर
चिनी मॅलवेअरनं भारतात वीज पुरवठ्याला नियंत्रित करणाऱ्या घुसखोरी केली होती असा दावा या अभ्यासातून करण्यात आला आहे. यामध्ये हाय वोल्टेज ट्रान्समिशन सबस्टेशन आणि थर्मल पॉवर प्लान्टही सामील होते. अमेरिकन सायबर सिक्युरिटी कंपनी रेकॉर्डेड फ्युचर जी सरकारी एजन्सीसोबक इंटरेटच्या उपयोगाचा अभ्यास करते त्यांनी आपल्या अभ्यासात सांगितलं की जास्त चिनी मॅलवेअर अॅक्टिव्हेट करण्यात आले नव्हते. आम्ही भारताच्या पॉवर सिस्टममध्ये पोहोचू शकलो नाही त्यामुळे आम्हाला याचा अधिक तपास करता आला नसल्याचंही कंपनीनं म्हटलं.
मुंबईत पॉवर ग्रिड फेल्युअर
"चीनची सरकारी रेड इको हॅकर्स नावाच्या एका कंपनीनं गुपचुपपणे भारतातील अनेक पॉवर जनरेशन आणि ट्रान्समिशन लाईन्समध्ये घुसखोरी करण्यासाठी सायबर हॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर केला होता. त्याच वेळी मुंबईत पॉवर ग्रिड फेल झाल्यानं वीज पुरवठा बाधित झाला होता," अशी माहिती रेकॉर्डेड फ्युचर कंपनीचे सीओओ स्टुअर्ट सोलोमन यांनी सांगितलं.