मुंबई दैनंदिन लसीकरण उद्दिष्टापासून दूरच लसीकरणाची कासवगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:06 AM2021-05-28T04:06:34+5:302021-05-28T04:06:34+5:30

मुंबई - कोरोनावरील लढाई जिंकण्यासाठी म्हणून १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना ...

Mumbai The pace of vaccination far from the daily vaccination target | मुंबई दैनंदिन लसीकरण उद्दिष्टापासून दूरच लसीकरणाची कासवगती

मुंबई दैनंदिन लसीकरण उद्दिष्टापासून दूरच लसीकरणाची कासवगती

Next

मुंबई - कोरोनावरील लढाई जिंकण्यासाठी म्हणून १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात आली. १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील आजारी असलेल्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. तर, १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत होती. मात्र, लसीचा तुटवडा असल्याने या वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे बंद करण्यात आले. सध्या आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर तसेच ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण केले जात आहे. परंतु, अजूनही विविध अडथळ्यांमुळे दैनंदिन लसीकरणाच्या ५० हजाराच्या उद्दिष्टापासून मुंबई महानगरपालिका प्रशासन दूरच असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत रोज ३० ते ५० हजार लसीचे डोस दिले जात होते. लसीकरणाला मोठ्या संख्येने नागरिक येत असल्याने व लसीचा पुरवठा कमी होत असल्याने लसीचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेक वेळा लसीकरण ठप्प झाले होते. लसीच्या तुटवड्यामुळे शनिवार, १५ मे आणि रविवार, १६ मे असे दोन दिवस लसीकरण बंद होते. तर, सोमवारी, १७ मे रोजी तौक्ते चक्रीवादळामुळे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. आता पुन्हा लसीकरण सुरू असून लसीच्या पुरवठ्याप्रमाणे लसीकरण केले जात आहे.

सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यासाठी पालिकेने ॲक्शन प्लान तयार केला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांना लस देऊन सुरक्षित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी सोमवार ते बुधवार वॉक इन तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने लसीकरण केले जात आहे.

याविषयी, पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, लसीच्या तुटवड्यामुळे दैनंदिन उद्दिष्ट गाठणे शक्य होत नाही. मात्र जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लस मिळावी यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. जून महिन्यापासून लसीची उपलब्धता सुरळीत होईल, यासाठी राज्य शासन धडपड करीत आहे. त्यानंतर दैनंदिन उद्दिष्टपूर्ती करणे सहज शक्य होईल, असा विश्वास आहे.

दिनांकदिवसभरातील लसीकरण

२२ मे १४ हजार ८०६

२४ मे १३ हजार ३६७

२५ मे २० हजार २२९

२६ मे १८ हजार ४८१

एकूण लसीकरण

आरोग्य कर्मचारी - ३,२५,१७६

फ्रंटलाईन वर्कर - ३,७८,९५२

४५ हून अधिक - २२,७०,६६२

१८ ते ४४ - १,३४,४३६

एकूण - ३१,०८,३२६

Web Title: Mumbai The pace of vaccination far from the daily vaccination target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.