Join us

पाली हिलमध्ये वर्षात ५०० कोटींच्या घरांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 9:43 AM

वांद्रे पाली हिल परिसरात गेल्या वर्षी तब्बल ५०० कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाली आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील नामवंत कलाकारांच्या निवासस्थानांमुळे लोकप्रिय असलेल्या वांद्रे पाली हिल परिसरात गेल्या वर्षी तब्बल ५०० कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाली आहे. माहितीनुसार, पाली हिल परिसरात गेल्या वर्षी एकूण ३९ आलिशान घरांची विक्री झाली. विक्री झालेल्या घरांच्या किमती या किमान १५ कोटी ते ११५ कोटी रुपयांच्या दरम्यान आहेत. मुंबईतल्या अन्य भागांच्या तुलनेत एका छोट्याशा विभागात ५०० कोटी रुपयांची विक्री विक्रमी मानली जात आहे. 

३९ घरांपैकी १७ घरे ही तीन बेडरूम किचनची तर १३ घरे चार बेडरूमची आहेत. उर्वरित ९ घरे त्यापेक्षा मोठ्या आकाराची  आहेत. या विभागात गेल्यावर्षी दोन मजल्यांची खरेदी एका व्यावसायिकाने ११५ कोटी रुपयांना केली होती. येथेच अभिनेता आमीर खान राहत असलेली सोसायटी आहे. या सोसायटीला पुनर्विकासाचे वेध लागले आहेत. सध्याच्या जुन्या इमारतीच्या जागी ४ आणि ५ बीएचके आकारमानाचे आलिशान फ्लॅट उभे राहणार असून, याद्वारे ५०० कोटी रुपयांच्या उलाढालीचा अंदाज आहे. दिलीप कुमार यांच्या बाजूला राज कपूर यांचा बंगला होता. त्या बंगल्याच्या जागीदेखील आलिशान इमारत उभारली जात आहे. 

पाली हिलचे नवे रहिवासी :

अभिनेत्री प्रीती झिंटा हिने गेल्याच वर्षी पाली हिल येथे १७ कोटी रुपयांना एका आलिशान फ्लॅटची खरेदी केली आहे. प्रीतीने खरेदी केलेल्या फ्लॅटचे क्षेत्रफळ १,४७४ चौरस फूट आहे. त्यासोबत तिला दोन वाहनतळ मिळाले आहेत. 

वांद्र्यातच समुद्रकिनारी काही महिन्यांपूर्वी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी सागर रेशम नावाच्या इमारतीमध्ये चार मजली आलिशान फ्लॅटची खरेदी केली असून, याची किंमत तब्बल ११९ कोटी रुपये आहे.

पाली हिलला पुनर्विकासाचे वेध :

  पाली हिलमध्ये बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांची घरे आहेत. यातील अनेक बंगल्यांना पुनर्विकासाचे वेध लागले आहेत. 

  बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे अभिनेते दिलीप कुमार यांच्या महाकाय बंगल्याच्या जागी एकूण ११ मजल्यांची इमारत येथे उभारण्यात येत असून १ लाख ७५ हजार चौरस फुटांचे बांधकाम होत असल्याची माहिती आहे.

  याचसोबत दिलीप कुमार यांच्या सन्मानार्थ त्या जागी त्यांच्या कामाची माहिती देणारे संग्रहालयदेखील बांधण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

  पाली हिलच्या खालील बाजूस कार्टर रोडला समुद्रासमोर सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आशीर्वाद बंगला होता. त्याजागीदेखील आता आलिशान इमारत उभी राहिली आहे. 

८०,००० रुपयांपर्यंतचे विक्रमी दर :

  पाली हिल परिसरात सरत्या वर्षात प्रती चौरस फूट दराने प्रथमच ८० हजार रुपयांचा विक्रमी दर गाठला. 

  या परिसरात ६० हजार ते ७० हजार रुपयांच्या दरम्यान दर स्थिर होते. मात्र, सरत्या वर्षात तेथे पुनर्विकासाची कामे मार्गी लागल्यामुळे तेथील दरांनी ८० हजारांना स्पर्श केल्याचे समजते.

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योग