मुंबई-पारबंदर प्रकल्प सुसाट होणार, पहिल्या व तिस-या टप्प्याचा करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 05:30 AM2017-12-27T05:30:53+5:302017-12-27T05:30:58+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या पहिल्या व तिस-या टप्प्याच्या कामासाठी कंत्राटदारांशी करार केला आहे. वांद्रे कुर्ला संकुल येथे मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, जपानचे परिवहन आणि पर्यटनमंत्री किशी इशी त्यांच्या १५ सदस्यांबरोबर उपस्थित होते.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या पहिल्या व तिस-या टप्प्याच्या कामासाठी कंत्राटदारांशी करार केला आहे. वांद्रे कुर्ला संकुल येथे मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, जपानचे परिवहन आणि पर्यटनमंत्री किशी इशी त्यांच्या १५ सदस्यांबरोबर उपस्थित होते. या प्रकल्पास जपान इंटरनॅशनल को-आॅपरेशन एजन्सी (जायका) निधी पुरविणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात शिवडीपासून १०.३८ किलोमीटर बांधकाम मे. एल अँड टी आणि आयएचआय, जपान यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ७ हजार ६३७ कोटी ३० लाख रुपये इतका खर्च येणार आहे, तर तिसºया टप्प्यात चिर्लेपर्यंतच्या ३.६१३ किलोमीटरचे बांधकाम मे. एल अँड टी लि. इंडिया करणार असून, त्यासाठी १ हजार १३ कोटी ७९ लाख रुपये खर्च येणार आहे. या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवी मुंबई आणि कोकण प्रदेशाशी वेगवान जोडणी आणि त्याद्वारे विकासाच्या दृष्टीने आज एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
या बहुप्रतीक्षित प्रकल्पामुळे जोडणी, परिवहन, पायाभूत सुविधा आणि रोजगार अशा विविधांगी संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला, तर या प्रकल्पाला जायकाद्वारे निधी पुरविणार असल्याने, भविष्यात इंडो-जापनीज संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास किशी इशी यांनी व्यक्त केला.