मुंबई: बेळगाव सीमाप्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील वादग्रस्त भाग हा केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा, अशी मागणी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. बेळगाव म्हणजे कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
बेळगाव म्हणजे कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. कर्नाटक सरकारनं बेळगावचं नामकरण बेलगाम करून तिथे बेलगामपणे अत्याचार सुरू केले आहेत. याविरोधात आपण पक्षीय मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 'महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद- संघर्ष व संकल्प' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहे.
लक्ष्मण सवदी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, बेळगाव सोडा, मुंबई पण कर्नाटकचा भाग होता, मुंबईवर पण आमचा हक्क आहे. मुंबई प्रदेश हा केंद्रशासित करा, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करणार आहोत,' असं विधानही लक्ष्मण सवदी यांनी केलं आहे. लक्ष्मण सवदी यांच्या या वादग्रस्त विधानानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.
कन्नड संघटनांनी आज प्रकाशित झालेलं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाच्या प्रतीकात्मक प्रती जाळल्या आहेत. बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या आणि अन्य संघटनांनी आंदोलन केलं. केंद्र सरकारने पुस्तक प्रकाशित करू देऊ नये, अशी मागणीही या संघटनांनी केली आहे. तसंच उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, कर्नाटकात असलेलं बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून लढा सुरू आहे. या विषयावरील 'महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद- संघर्ष व संकल्प' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील मोठे नेते उपस्थित होते.
बेळगावसाठी पेटून उठण्याचं आवाहन-
कर्नाटकमध्ये कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरीही बेळगावबद्दलचं त्यांचं धोरण बदलत नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही तिथलं सरकार बेळगावचं नामांतर करतं. बेळगावला उपराजधानीचा दर्जा देतं. तिथे विधिमंडळाचं अधिवेशन घेतं. आपण मात्र कायद्याचा विचार करत राहतो. बेळगाव महाराष्ट्रात आणायचं असल्यास आपल्याला एकजूट दाखवावी लागेल. पुन्हा आग जागवावी लागेल. निखारा धगधगता आहेच. त्यावरील राख फुंकर मारून बाजूला करावी लागेल, अशा शब्दांत बेळगावसाठी पेटून उठण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केलं.
मराठी माणसाला न्याय मिळायलाच हवा
सीमावादाच्या आंदोलनावरुन आमच्या सगळ्यांच्या यातना एक-दोन दिवसांच्या असतील पण सीमा भागात राहणारा तरुण पिढ्यांपिढ्या यातना सहन करतोय. मी मराठी आहे आणि मराठी भाषिकच म्हणून जगण्याचा अधिकार मला आहे. या भावनेतून अनेक वर्ष हा संघर्ष सुरू आहे. त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी मराठी माणसांची आहे. त्यांनी आपल्या रोखठोक भूमिकेतून अजूनही चळवळ धगधगद ठेवली आहे. त्यामुळे त्यांना न्याय मिळायला हवा, असंही पवार म्हणाले.
पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती आणावी
"गेले अनेक वर्ष ज्या प्रश्नासाठी मराठी माणूस अस्वस्थ आहे, त्या प्रश्नाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पुस्तक रुपाने कायमस्वरुपी समाजासमोर कायमस्वरुपी राहावी यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतला. डॉ. दीपक पवार यांच्यावर जबाबदारी टाकून हा एक ग्रंथ आज आपल्या सर्वांसमोर त्यांनी सादर केला. पण या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती देखील यायला हवी. जेणेकरुन या संघर्षाची कहाणी सर्वांपर्यंत पोहोचेल", असं शरद पवार म्हणाले.