Mumbai: उन्हाळ्यामुळे प्रवासी वळले एसी लोकलकडे, फेऱ्या कमी असल्याने होतो मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 12:49 PM2023-04-18T12:49:24+5:302023-04-18T12:50:00+5:30
Mumbai: मुंबईत दमट हवामान त्यातच तीव्र उन्हाळ्यामुळे लोकलचा प्रवास नकोस वाटतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांनी मुंबईतील एसी लोकलकडे धाव घेतली. मात्र, अपुऱ्या एसी लोकल फेऱ्यांमुळे प्रवासी हैराण झालेले आहेत.
मुंबई : मुंबईत दमट हवामान त्यातच तीव्र उन्हाळ्यामुळे लोकलचा प्रवास नकोस वाटतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांनी मुंबईतील एसी लोकलकडे धाव घेतली. मात्र, अपुऱ्या एसी लोकल फेऱ्यांमुळे प्रवासी हैराण झालेले आहेत. तसेच रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी एसी लोकलचा फेऱ्या रद्द करण्यात येत असल्याने साध्या लोकलमधून प्रवाशांना प्रवास करण्याची वेळ प्रवाशांना येते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने एसी लोकल प्रवाशांकडेही लक्ष देण्याची मागणी केली आहे.
मुंबई आणि उपनगरामध्ये दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे एसी लोकलकडे प्रवाशांनी आपला मोर्चा वळविला आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर दिवसाला ७९ तर मध्य रेल्वेवर ५६ फेऱ्या या एसी लोकलच्या चालविण्यात येतात. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते बोरीवली, विरार तर मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळादरम्यान या एसी लोकल धावत आहेत. परंतु, एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या कमी असल्याने एसी लोकलचे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अवघ्या ५६ एसी फेऱ्या धावतात. सामान्य लोकल फेऱ्यांची संख्या एकूण १ हजार ८१० इतकी आहे. आता उन्हाळा आल्याने मध्य रेल्वेवर दररोज ५५ ते ६० हजार प्रवासी प्रवास करीत आहे. जी फेब्रुवारी महिन्यात २५ ते ३० हजारच्या घरात होती. सीएसएमटी ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार दरम्यान मासिक पास प्रत्येकी दोन हजारांहून अधिक आहे. रविवारी लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या जातात. सार्वजिनक सुट्टी असल्याने या दिवसातही फेऱ्या रद्द होतात. त्यामुळे पासधारकांचे नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे.
पश्चिम रेल्वेवर मार्च महिन्यात एसी लोकलमधून दिवसाला ९० हजार ४० प्रवासी प्रवास करायचे. एप्रिल महिन्यात हीच संख्या १ लाख २ हजार ३४७ वर पोहोचली आहे. सध्या एसी लोकलमधून सर्वाधिक प्रवासी विरार, भाईंदर, बोरीवली आणि मीरा रोड स्थानकातून प्रवास करत आहेत.
- सुमीत ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
उन्हाळा असल्याने एसी लोकलची प्रवासी संख्या प्रचंड वाढली. परंतु, एसी लोकलच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये एसी लोकलचा फेऱ्या रद्द असतात, त्यामुळे मासिक-त्रैमासिक पाससह तिकीटधारक प्रवाशांचे नुकसान होते. रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या प्रवाशांच्या अडचणी समजून यावर तोडगा काढायला पाहिजे.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष रेल यात्री परिषद