पालिकेच्या ‘सीबीएसई’शाळांसाठी झुंबड; तुलनेने नवीन शाळांना मागणी कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 09:57 AM2024-01-23T09:57:21+5:302024-01-23T09:59:02+5:30
३,०६० जागांवरील प्रवेशांकरिता अवघे १,९४६ अर्ज.
मुंबई : महापालिकेच्या ‘मुंबई पब्लिक स्कूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’शी (सीबीएसई) संलग्नित जुन्या शाळांना पालकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी नव्याने सुरू झालेल्या नव्या पाच शाळांमधील जागा मात्र पुरेशा अर्जाअभावी रिक्त राहण्याची शक्यता आहे. या शाळांमध्ये प्रत्येकी ६१२ मिळून ३,०६० जागांवरील प्रवेशांकरिता अवघे १,९४६ अर्ज आले आहेत.
दुसरीकडे जुन्या १४ शाळांमधील एकूण ३२६४ जागांकरिता तब्बल ८,२२४ प्रवेश अर्ज आले आहेत. जागांच्या तुलनेत दुप्पट अर्ज आल्याने अनेक पालकांचा हिरमोड होणार आहे.
जुन्या शाळांपैकी प्रतीक्षानगर (जोगेश्वरी) (जागा २३८) शाळेसाठी १,१६३, आशिष तलाव (वडवली) शाळेसाठी (जागा ४७६) १,१३२, पूनमनगर (अंधेरी (पू.) शाळेसाठी (जागा २३८) शाळेसाठी १,०३८ अर्ज आले आहेत. अपवाद केवळ मुलुंडच्या मीठागर शाळेचा. येथील २३८ जागांकरिता केवळ १७२ अर्ज आले आहेत. आजूबाजूच्या परिसरात अन्य खासगी वा पालिकेच्या शाळा नाहीत, अशा ठिकाणच्या शाळांना मागणी असल्याचे निरीक्षण पालिका अधिकाऱ्यांनी नोंदवले.
सीबीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळाशी संलग्नित शाळा सुरू करण्याचा निर्णय पालिकेने तीन वर्षांपूर्वी घेतला. तेव्हापासून या शाळांसाठी स्वतंत्रपणे प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. यंदा सीबीएसईच्या १४ शाळांमध्ये बोरा बझार, शांतीनगर, नटवरलाल पारेख कंपाउंड, मालवणी टाऊनशिप (मालाड), वीर सावरकर मार्ग येथील पाच शाळांची भर पडली आहे.
शाळा जागा अर्ज
चिकुवाडी (बोरीवली) २३८ ४५५
जनकल्याणनगर (मालाड) २३८ ५०७
प्रतीक्षानगर (जोगेश्वरी) २३८ १,१६३
मीठागर (मुलुंड) २३८ १७२
हरियाली विलेज (विक्रोळी) २३८ ८३७
राजावाडी (घाटकोपर) २३८ ४१६
अजिज बाग (चेंबूर) २३८ ६५५
तुंगा विलेज (पवई) २३८ ७२४
भवानी शंकर रोड (दादर) २३८ ४५८
काणेनगर (सायन) २३८ २६५
पूनमनगर (अंधेरी (पू.) २३८ १,०३८
जिजामातानगर १७० ३३१
आशिष तलाव (वडवली) ४७६ १,१३२
एम.जी.क्रॉस रोड क्र.१ ४७६ ३७२
बोरा बझार ६१२ २३
शांतीनगर ६१२ ३६७
नटवरलाल पारेख कंपाउंड ६१२ ७५६
मालवणी टाऊनशिप (मालाड) ६१२ ४०९
वीर सावरकर मार्ग ६१२ ३९१
पालिकेच्या इतर शिक्षण मंडळांच्या शाळांचा प्रतिसाद दरवर्षी वाढतो आहे. पालकांच्या वाढत्या मागणीमुळे अनेक शाळांमध्ये नवीन तुकडी सुरू करण्यात आली आहे. याकरिता प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे.- सायली सुर्वे, अधीक्षक, अन्य बोर्ड, मुंबई महापालिका