प्रदूषणाशी मुंबईकरांनी एकत्रित लढणे गरजेचे - किशोरी पेडणेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 03:21 AM2020-02-01T03:21:58+5:302020-02-01T03:22:15+5:30
‘ब्रेथलेस : भारताच्या हवाप्रदूषण संकटाला सामोरे जाण्यासाठी एक कलात्मक आवाज’ या वांद्रे येथील दी बॉम्बे आर्ट सोसायटी येथे आयोजित प्रदर्शनाला शुक्रवारी दिलेल्या भेटीदरम्यान किशोरी पेडणेकर बोलत होत्या.
मुंबई : वाढते वायुप्रदूषण या गंभीर संकटाचा सामना करण्यासाठी सर्व मुंबईकरांनी एकत्रित लढा उभारला पाहिजे. प्रत्येक नागरिकाने याबद्दल सतर्क असले पाहिजे. आपण लवकरच या संदर्भात निर्णायक आणि ठोस पावले उचलू, असे आश्वासन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले.
‘ब्रेथलेस : भारताच्या हवाप्रदूषण संकटाला सामोरे जाण्यासाठी एक कलात्मक आवाज’ या वांद्रे येथील दी बॉम्बे आर्ट सोसायटी येथे आयोजित प्रदर्शनाला शुक्रवारी दिलेल्या भेटीदरम्यान किशोरी पेडणेकर बोलत होत्या. या प्रदर्शनात गीतकार, गायक अंकुर तिवारी, छायाचित्रकार ईशान तांखा यांनी संगीत आणि छायाचित्रणाचा वापर वायुप्रदूषणाचा मानवी आयुष्यावर होत असलेल्या परिणामांची माहिती देण्यासाठी केला आहे. देशभरातील छोट्या- छोट्या शहरातील गोष्टी, अवस्था लोकांना कळावी.
तेथील समस्यांची, त्यांच्या लढण्याची जाणीव व्हावी, हे प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. वातावरण फाउंडेशन, झटका आॅर्ग यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वांद्रे येथील नॅशनल कॉलेजच्या परिसरात बसविण्यात आलेल्या कृत्रिम फुप्फुसांचा रंग प्रदूषणामुळे दोन आठवड्यांत पांढऱ्याचा काळा झाला होता. येथील वायुप्रदूषण तपासण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला.
२०१८ साली अशाच प्रकारे दिल्ली आणि बंगळुरू येथे कृत्रिम फुप्फुसे बसविण्यात आली होती. दिल्लीमध्ये अवघ्या ६ दिवसांत तर बंगळुरूमध्ये २५ दिवसांत या कृत्रिम फुप्फुसांचा रंग काळा पडला होता. महाराष्ट्रात वांद्रे येथे हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला. या माध्यमातून वायुप्रदूषणाचा आरोग्यावर होणारा परिणाम तपासण्यात आला, अशी माहिती झटका आॅर्ग आणि वातावरण फाउंडेशनकडून देण्यात आली.