मुंबईकरांनो, पाणी उकळून आणि गाळून प्या! दुरुस्तीच्या कामांमुळे दूषित पाणीपुरवठ्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 11:05 IST2025-04-08T11:04:05+5:302025-04-08T11:05:52+5:30
मुंबईतील काही भागांतील नागरिकांनी पाणी जपून आणि दक्षता घेऊन वापरावे, अशा सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत.

संग्रहित फोटो
मुंबईतील काही भागांतील नागरिकांनी पाणी जपून आणि दक्षता घेऊन वापरावे, अशा सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत. काही भागांत जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून पाणीपुरवठा बंद ठेवण्याबरोबरच नागरिकांनी पाणी जपून वापरा, पाणी उकळून प्या, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.
एच पश्चिम विभागातील वांद्रे केबिन, वांद्रे पूर्व येथील ६०० इंच व्यासाची तुलसी जलवाहिनी काढून टाकून त्याऐवजी वीन जलवाहिनी टाकण्याचे काम मंडळवारी ८ एप्रिल २०२५ रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे एच पूर्व विभागातील वांद्रे-कुर्ला संकुल परिसरामध्ये पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असून सायंकाळी ५ ते ७.३० या कालावधीतील पाणीपुरवठा खंडित केला जाणार असल्याची माहिती पालिकेने काम पूर्ण झाल्यानंतर एच पूर्व विभागाच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा होणे अपेक्षित आहे.
या भागांत झाला होता दूषित पाणीपुरवठा
बोरीवली पश्चिमेकडील गोराई आणि कुलवेम येथे दूषित पाणी येत असल्याच्या अनेक तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत.
रस्त्याच्या कामामुळे जलवाहिन्यांचे नुकसान झाल्याने पाणी दूषित होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून पी उत्तर ते आर मध्य वॉर्डातील मनोरी, कुलवेम आणि गोराई येथेही याचा परिणाम झाला आहे.
पाण्याचा साठा करा
संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा खंडित कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे, तसेच पुढील ४ ते ५ दिवस पाणी गाळून, उकळून प्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.