मुंबई पुन्हा खड्ड्यात; वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 02:30 AM2020-08-11T02:30:02+5:302020-08-11T07:39:29+5:30
महापालिका म्हणते अवघे ९५ खड्डे शिल्लक; मुसळधार पावसाचा फटका
मुंबई : गेल्या आठवड्यात मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी तुंबले. पेडर रोड येथील संरक्षक भिंत कोसळून रस्त्याचे नुकसान झाले. या मुसळधार पावसाने आणखी एक अडचण निर्माण केली आहे. मुंबईतील काही रस्त्यांवर खड्डे दिसून येऊ लागले आहेत. यामुळे काही ठिकाणी वाहन चालकांची वाट बिकट झाली आहे. तर काही ठिकाणी वाहतूक मंदावली आहे. मात्र बहुतांश खड्डे भरले असून केवळ ९५ खड्डे शिल्लक असल्याचा दावा महापालिका करीत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. गेल्या दहा वर्षांत खड्ड्यांच्या तक्रारींमध्ये १५० टक्के वाढ होतानाच दिसून आली आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर दरवेळी रस्त्यांचे काम हाती घेण्यात येते. २०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे सर्व विकास काम लांबणीवर पडली. निवडणुकीनंतर रस्त्यांचे काम वेग घेण्यापूर्वीच कोरोनाचा प्रसार वाढला. परिणामी, रस्त्यांची कामं काही काळ लांबणीवर पडली. मात्र लॉकडाऊनच्या काळात रस्ता मोकळा असल्याने बराच काळ रखडलेल्या रस्त्यांची कामेही उरकण्यात आली, असा दावा पालिका अधिकारी करीत आहेत.
मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार कोसळणाºया मुसळधार पावसाने पुन्हा एकदा मुंबईतील रत्स्यांवर खड्ड्यांचे दर्शन होऊ लागले आहे. अंधेरी, कुर्ला, साकीनाका, मालाड, सायन-पनवेल मार्ग, घाटकोपर आदी ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. गतवर्षी या काळात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांच्या तक्रारी पालिकेच्या संकेतस्थळावर आल्या होत्या. परंतु, यंदा हे प्रमाण अत्यंत कमी आहे. आतापर्यंत पावसाळ्यात केवळ ४१२ खड्ड्यांची नोंद झाली आहे. यापैकी ३३७ खड्डे बुजवले आहेत. तर उर्वरित ९५ खड्डे बुजविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वाहतुकीला लागला ब्रेक
अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतुकीला ब्रेक लागला आहे. वेस्टर्न एक्सप्रेस वे येथे खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांचे तासन् तास वाया जात आहत. मुंबईतील अनेक रस्त्यावर खड्डे असल्याने वाहतूक धीम्यागतीने सुरू आहे. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवर खड्डे नाहीत, पण डांबरी रस्त्यावर खड्डे दिसून येत आहेत. एका मार्गिकेमधून दररोज एक हजार वाहनं जात असतील तर पावसामुळे त्यांचा वेग आठशे गाड्यांवर येतो. त्याच रस्त्यावर खड्डे असल्यास हे प्रमाण पाचशे गाड्यांवर येते. तसेच खड्ड्यामुळे अनेकदा गाड्यांमध्ये बिघाड होतो, गाड्या बंद पडतात. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. पावसात हे खड्डे दिसत नसल्याने वाहनाचे नुकसान होते.
पूर्व उपनगरतील रस्ते खड्ड्यात
पूर्व उपनगरात अनेक महत्त्वाच्या व मोठ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. सायन-पनवेल मार्ग तसेच घाटकोपर व मानखुर्द विभागांना जोडणाºया जिजाबाई भोसले मार्गावर खड्डे पडले आहेत. या मार्गांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमधील माती रस्त्यावर पसरल्याने दुचाकीस्वार घसरून त्यांचा अपघात होत आहे. सायन-पनवेल मार्गावर सायन येथून पुढे येताच एव्हरार्ड नगर, प्रियदर्शनी, उमरशी बाप्पा चौक, डायमंड गार्डन, देवनार, मानखुर्द सिग्नल या ठिकाणांवर खड्डेच खड्डे आहेत.
जिजाबाई भोसले मार्गाचीही खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. शिवाजीनगर, बैंगन वाडी, मानखुर्द सिग्नल व घाटकोपर सिग्नल येथील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावत आहे. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक जास्त असल्याने येथे खड्ड्यांमुळे एखाद्या मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
७० टक्के वाहने रस्त्यांवर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागत आहे. सार्वजनिक बसमध्ये प्रवाशांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे अनेक जण खासगी वाहने बाहेर काढत आहेत. त्यामध्ये दुचाकीची संख्या अधिक आहे. मुंबईतील रस्त्यावर सध्या ७० टक्के वाहने आहेत असे वाहतूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.