Join us

Mumbai Plane Crash : नवऱ्याच्या 'सरप्राइज'नं खुशीत होती पायलट मार्या; आनंदी दिवसाचा शेवट झाला दुर्दैवी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 2:20 PM

घाटकोपरमधील चार्टर्ड विमानाच्या दुर्घटनेवेळी प्रसंगावधान दाखवत हजारो नागरिकांचे प्राण वाचवणारी पायलट मार्या झुबेरीचा मृत्यू सगळ्यांनाच चटका लावून गेला आहे.

मुंबईः नवऱ्याने दिलेलं 'सरप्राइज' हे बायकांसाठी किती अमूल्य असतं हे वेगळं सांगायची गरज नाही. असंच 'भारी' सरप्राइज नवरोबाकडून मिळाल्यानं पायलट मार्या झुबेरी जणू आनंदाच्या लाटेवर तरंगत होती. पण, नियतीनं होत्याचं नव्हतं केलं आणि आनंदी दिवसाचा शेवट दुर्दैवी झाला.  

घाटकोपरमधील चार्टर्ड विमानाच्या दुर्घटनेवेळी प्रसंगावधान दाखवत हजारो नागरिकांचे प्राण वाचवणारी पायलट मार्या झुबेरीचा मृत्यू सगळ्यांनाच चटका लावून गेला आहे. मी दुपारी जेवायला नाहीए, असं सांगून विमानाच्या चाचणीसाठी घाईघाईतच घराबाहेर पडलेली मार्या आता कधीच परत येणार नसल्याच्या विचाराने तिचे कुटुंबीयही पार हादरलेत. दिल्लीत काम करणारा मार्याचा नवरा - प्रभात कठुरिया यानं काही तासांपूर्वीच अचानक घरी येऊन तिला सरप्राइज दिलं होतं. दुर्दैवानं, हे तिचं शेवटचं सरप्राइज ठरलं.

मार्यासाठी कालची सकाळ फारच लगबगीची होती. चार्टर्ड विमानाच्या चाचणीसाठी तिला लवकर जुहूला पोहोचायचं होतं. त्यामुळे स्वयंपाकी मावशींना द्यायचा सूचना तिनं नवऱ्याला सांगितल्या आणि ती घाईघाईत घराबाहेर पडली. अर्थात, नवरा अचानक सुटी घेऊन आल्यानं ती खुशीत होती आणि मोठा आधार मिळाल्याची भावनाही तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पण, हे सुख फारच अल्पकाळ टिकलं. पुढच्या काही तासांत मार्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

चाचणीसाठी उडवण्यात आलेलं यूवाय एव्हिएशन कंपनीचं चार्टर्ड विमान गुरुवारी दुपारी घाटकोपरच्या जीवदया गल्लीत कोसळल्यानं मुंबईत खळबळ उडाली होती. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता, त्यात मार्या झुबेरीही होत्या. विमान कोसळत असल्याचं लक्षात येताच त्यांनी कौशल्य पणाला लावून, दाट मनुष्यवस्ती नसलेला भाग निवडला होता आणि अनेकांचे प्राण वाचवले होते. वास्तविक, हवामान खराब असल्यानं मार्या यांनी चाचणीला विरोधच केला होता. पण कंपनीनं त्यांना चाचणी घेण्यास भाग पाडलं, असा आरोप पती प्रभात कथुरिया यांनी केला आहे. 

टॅग्स :मुंबई विमान दुर्घटनाघाटकोपरमुंबईअपघातमार्या झुबेरीविमान