Join us

कुस्तीगीर महिलांसाठी मुंबईचे खेळाडू मैदानात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 12:32 PM

अल्पवयीन कुस्तिगीर खेळाडूंचे गंभीर आरोप असलेल्या खासदार ब्रीजभूषण शरण सिंग यांना त्वरित अटक करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भविष्यात महिला कुस्तीगीर खेळाडूंना लैंगिक अत्याचार सहन करावा लागू नये म्हणून निर्भीडपणे आंदोलन करण्याच्या कुस्तीगीर महिला खेळाडूंना आम्ही पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट करीत मुंबईतील कुस्तीगीर महिला लैंगिक अत्याचार विरोधी नागरिक समितीने मंगळवारी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. अल्पवयीन कुस्तिगीर खेळाडूंचे गंभीर आरोप असलेल्या खासदार ब्रीजभूषण शरण सिंग यांना त्वरित अटक करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

कुस्तीगीर महिलांच्या लैंगिक अत्याचार विरोधी आंदोलनाबाबत मुंबईतील महिला खेळाडू, दक्ष नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या कुस्तीगीर महिला लैंगिक अत्याचार विरोधी नागरिक समितीने मंगळवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. खेळाडूंचे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न करणारे प्रशासन आणि त्याच्या न्यायहक्कासाठी आक्रोशाकडे असंवेदनशीलपणे दुर्लक्ष करणारे सरकार यांना जागे करण्यासाठी कुस्तीगीर महिला लैंगिक अत्याचार विरोधी नागरिक समितीने आंदोलन पुकारले आहे. ९ तारखेला शिवाजी पार्क येथे सामूहिक बैठक होणार आहे.

या आंदोलनाच्या माध्यमातून समितीने काही मागण्या केल्या आहेत. अल्पवयीन कुस्तीगीर खेळाडूंनी खासदार सिंग यांच्यावर केलेल्या आरोपासाठी या कायद्यातील तरतुदी अंतर्गत त्यांना अटक झाली पाहिजे.  महिंद्र चेंबूरकर, सुनील लिमये, मनोहर साळवी, प्रदीप कवठे, योगिनी राऊळ, सुनील वालावलकर, फिरोज मिठबोरवाला, संगीता जोशी, जय कवळी, निला लिमये आदी  उपस्थित होते.

राजकीय पदे काढा

कोणत्याही दबावाशिवाय सिंग यांची चौकशी करता यावी म्हणून त्याचे राजकीय अधिकार पदे काढून घेऊन त्वरित अटक करावी तसेच कुस्तीगीर महिला खेळाडूंना खेळाची क्षेत्र सुरक्षित आणि त्याच्या विकासासाठी पोषक ठेवण्यासाठी सरकार आणि समाज कटिबद्ध आहे हे सिद्ध करण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या लेखी मागणी पत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :कुस्तीमुंबई