मुंबई - 'ऑन ड्युटी 24 तास' अशी ओळख असलेल्या मुंबई पोलिसांसाठी एक गुड न्यूज आहे. मुंबई पोलिसांना आता 12 तासांऐवजी केवळ 8 तासांचीच ड्युटी करावी लागणार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पोलिसांना नव्या वर्षाची भेट दिली आहे.
'मिशन 8 अवर्स' या कार्यक्रमात मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी ही घोषणा केली. गेली वर्षभर मुंबई पोलीस दलातील देवनार आणि नंतर काही पोलीस स्टेशनमध्ये ही 'ऑन ड्युटी 8 तास' संकल्पना राबवण्यात आली. मात्र, सुरुवातीला काही अडचणी निर्माण झाल्या पण वरिष्ठ पातळीवर यावर तोडगा काढण्यात आल्यानं हा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशनमधील पोलिसांची संख्या लक्षात घेऊन लवकरच 'ऑन ड्युटी 8 तास'ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
यामुळे दररोज सरासरी 10 ते 14 तास किंवा त्याहून अधिक तास राबणाऱ्या पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे. अन्य सरकारी खात्यांप्रमाणे पोलिसांनाही ८ तास ड्युटी देण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. पोलीस पत्नी संघटनेनेही त्यासाठी आंदोलन पुकारले होते.