Join us

मुंबई पोलिसांनाही हवा गँगस्टर रवी पुजारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 3:42 AM

दक्षिण आफ्रिकेत अटक; रॉ आणि मंगळुरू पोलिसांची कारवाई यशस्वी

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत अटक करण्यात आलेल्या कुख्यात गॅगस्टर रवी पुजारी याला सोमवारी पहाटेपर्यंत भारतात आणले जाण्याची शक्यता असून मंगळुरू, अहमदाबाद पोलिसांप्रमाणेच मुंबई पोलिसांनाही त्याचा ताबा हवा आहे. त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया रविवारी रात्रीपर्यंत सुरू होती. मुंबईसह महाराष्ट्रात त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न व खंडणीसह ५६ गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यासाठी मुंबई पोलिसांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.१५ वर्षांपासून फरार असलेल्या रवी पुजारीला २५ दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत सुटूर येथील सेनेगल येथे अटक झाली होती. मात्र त्यातून जामीन मिळाल्यानंतर तो फरारी झाला होता. मात्र भारतीय संशोधन अ‍ॅण्ड विश्लेषण कक्ष (रॉ) आणि मंगळूरच्या पोलिसांच्या विशेष पथकाने संयुक्त कारवाई करून त्याला शुक्रवारी पुन्हा अटक केली. पुजारी हा त्या ठिकाणी अ‍ॅन्थोनी फर्नांडिस या नावाने हॉटेल व्यावसायिक असल्याचे भासवून राहात होता. त्याने या नावाने बनावट पासपोर्ट व तेथे वास्तव्यासाठी अन्य कागदपत्रेही बनविली होती. तेथील दूतावासाशी संपर्क साधून त्याच्या प्रत्यार्पण (डिर्पोट) करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे.रवी पुजारीवर मुंबईसह महाराष्टÑाबरोबरच कर्नाटक व अहमदाबाद येथे खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरणाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. छोटा राजनपासून फारकत घेतलेल्या पुजारीने स्वत:चा सवतासुभा करीत दाऊद इब्राहिम टोळीचा म्होरक्या छोटा शकील, छोटा राजन यांच्याप्रमाणे टोळी स्थापन करून बांधकाम व्यावसायिक, सेलिब्रिटींना धमकावून खंडणीच्या माध्यमातून कोट्यवधींची वसुली केली आहे. भारतातून पलायन केलेल्या पुजारी व त्याची पत्नी पद्मा हिला पकडण्यासाठी इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. तो दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी सरकारला पत्र लिहिले होते.५२ वर्षांचा रवी पुजारी हा मूळचा कर्नाटकातील मंगळुरू येथील आहे. त्याला पत्नी, दोन मुली व एक मुलगा असून तेथे खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न आदी गुन्हे केल्यानंतर त्याला अटकही झाली होती. त्यानंतर १९९०ला त्याने मुंबईत अंधेरीत वास्तव्य करीत छोटा राजनच्या टोळीद्वारे अंडरवर्ल्डमध्ये शिरकाव केला. १९९५मध्ये चेंबूर येथील बांधकाम व्यावसायिक प्रकाश कुकरेजा यांची हत्या केल्यानंतर तो चर्चेत आला. त्याने बिल्डर, सेलिब्रिटींकडून खंडणी गोळा करण्याचा सपाटा लावला.पुजारीवर मुंबईसह सातारा, पुणे या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. २००५ मध्ये बॅँकॉकमध्ये छोटा राजनवर डी कंपनीच्या गॅगस्टरनी हल्ला केला होता. पुजारीने त्यांना माहिती पुरविल्याचा संशय राजनने घेतल्याने त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. त्यानंतर रवी पुजारीने स्वत:ची टोळी निर्माण केली. त्याच्याकडे आॅस्ट्रेलियन पासपोर्ट असून त्याद्वारे तो अनेक वर्षे चीन, दुबई, हाँगकाँगमध्ये वास्तव्य करीत होता.

टॅग्स :रवि पूजारी