Sameer Wankhede: पाय खोलात! वानखेडेंना दुहेरी दणका; एनसीबीनं चौकशी सुरू करण्यापूर्वीच अडचणी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 12:17 PM2021-10-27T12:17:01+5:302021-10-27T12:17:41+5:30

Sameer Wankhede: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होतेय

Mumbai Police Appoints Officer to Probe Allegations Against Sameer Wankhede | Sameer Wankhede: पाय खोलात! वानखेडेंना दुहेरी दणका; एनसीबीनं चौकशी सुरू करण्यापूर्वीच अडचणी वाढल्या

Sameer Wankhede: पाय खोलात! वानखेडेंना दुहेरी दणका; एनसीबीनं चौकशी सुरू करण्यापूर्वीच अडचणी वाढल्या

googlenewsNext

मुंबई: क्रूझ शिपवरील ड्रग्ज पार्टीची (Cruise Ship Drugs Party Case) चौकशी करत असलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या (Sameer Wankhede) अडचणी वाढल्या आहेत. एनसीबीकडून वानखेडेंची खाते अंतर्गत चौकशी होणार आहे. त्यासाठी एनसीबीचं पथक मुंबईत दाखल झालं आहे. मात्र त्याआधीच वानखेडेंची चौकशी मुंबई पोलिसांकडून होण्याची शक्यता आहे. सहाय्यक पोलीस दर्जाच्या अधिकाऱ्याकडून वानखेडेंची चौकशी होणार आहे. आर्यन खानच्या अटक प्रकरणात वानखेडेंना ८ कोटी रुपये मिळणार होते, असा सनसनाटी आरोप कारवाईवेळी साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल यांनी केला. या आरोपांची चौकशी मुंबई पोलीस करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडेंवर सातत्यानं आरोप होत आहेत. मंत्री नवाब मलिक दररोज पत्रकार परिषद घेऊन वानखेडेंनी केलेल्या कारवाया, त्यांनी नोकरी मिळवण्यासाठी वापरलेली कागदपत्रं याबद्दल गंभीर आरोप करत आहेत. याची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. वानखेडे यांच्या विरोधात दाखल झालेल्या सर्व तक्रारींची चौकशी त्यांच्याकडून केली जाणार आहे. आतापर्यंत मुंबईतील चार पोलीस ठाण्यांमध्ये वानखेडे यांच्याविरोधात तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.

क्रूझवरील कारवाईवेळी उपस्थित असलेले पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडेंसह इतरांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचा प्राथमिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मंगळवारी रात्री प्रभाकर साईल यांचा रेकॉर्ड कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आला. डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यानं प्रभाकर यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर तपासाला सुरुवात झाली. सध्या मुंबई पोलीस इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचा तपास करत आहेत.

प्रभाकर साईल यांनी त्यांच्या जबाबामध्ये काही व्यक्तींची नावं आणि ठिकाणं यांचा उल्लेख केला आहे. त्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन ते तपासले जातील. याशिवाय प्रभाकर यांच्या फोनचं लोकेशन तपासले जातील. प्रभाकर यांनी पैशांच्या व्यवहारांचा उल्लेख केला आहे. ज्या ठिकाणी या व्यवहाराबद्दल चर्चा झाली, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासले जातील. यानंतर प्राथमिक अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर या प्रकरणी एफआयआर दाखल करायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाईल.

Read in English

Web Title: Mumbai Police Appoints Officer to Probe Allegations Against Sameer Wankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.