मुंबई- ७ जानेवारी रोजी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन बॉम्ब ब्लॉस्ट करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीस हशतवाद विरोधी पथकाने अटक केली. या प्रकरणी या व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे.
७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजून २९ मिनिटांनी एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करुन धमकी दिली. १९९३ ला जसा बॉम्बब्लास्ट झाला तसा बॉम्बब्लास्ट २ महिन्यानंतर मुंबई मध्ये माहिम, भेंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा याठिकाणी होणार आहे. तसेच मुंबई मध्ये १९९३ सालासारख्या दंगली होणार आहेत, असा संदेश देण्यात आला.
Video: तुम्ही विष पाजलं तर...; पोलिसांकडून चहा पिण्यास अखिलेश यादव यांचा नकार
तसेच यासाठी बाहेरच्या राज्यातून लोकांना बॉम्बब्लास्ट व दंगली करण्यासाठी बोलवले आहे' असंही यात म्हटले होते, असा संदेश मुंबई पोलीसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून दहशतवाद विरोधी पथकाच्या नियंत्रण कक्षास प्राप्त झाला होता.
या कॉलच्या अनुषंगाने दहशतवाद विरोधी पथकाची ०२ पथके तयार करून चौकशी सुरू करण्यात आली. नियंत्रण कक्षास आलेल्या कॉलच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण करून नियंत्रण कक्षास कॉल करणारा व्यक्ती नबी याहया खान उर्फ के. जी. एन. लाला, वय ५५ वर्षे, राहणार, पठाणवाडी, मालाड पूर्व, मुंबई यास मालाड रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली.
या व्यक्तीकडे केलेल्या चौकशीत त्याने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षास धमकीचा कॉल केल्याचे सांगितलेले आहे. या व्यक्तीविरोधात मुंबई मध्ये जबरी चोरी, विनयभंग व अतिक्रमण असे १२ गुन्हे दाखल असून सन २०२१ मध्ये त्याला मालाड पोलीस ठाणे मार्फत तडीपार करण्यात आले होते. या व्यक्तीविरूध्द आझाद मैदान पोलीस ठाणे, मुंबई येथे गुनों क्र. ०६/ २०२३, कलम - ५०५ (१), ५०६ (२), १८२ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद इसमास आझाद मैदान पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे. नमूद गुन्हयाचा पुढील तपास आझाद मैदान पोलीस ठाणे हे करत आहेत.
ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटने मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली आहे.