मुंबई-
देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे मालक मुकेस अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याचा अखेर मुंबई पोलिसांनी शोध लावला आहे. तक्रार मिळाल्याच्या अवघ्या काही तासांत पोलिसांनी बोरीवली येथून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. पण फोन करणारी व्यक्ती ही मानसिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.
मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना ३ तासात संपवून टाकू; ८ वेळा धमकीचा फोन, पोलीस सतर्क!
मुंबईतील रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या लँड लाइनवर आज सकाळपासून आठवेळा मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले होते. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनानं मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी तातडीनं सायबर सेलची मदत घेत फोन कॉल करणाऱ्या व्यक्तीचा छडा लावला. तसंच सुरक्षेच्या कारणास्तवर मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानी देखील सुरक्षा वाढवली होती. तसंच संपूर्ण परिसराचा तपास केला होता.
तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीनं सुत्रं फिरवली आणि बोरिवलीतील एमएचबी कॉलनीमधून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं फोनवर आपलं नाव अफझल असल्याचं सांगितलं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अर्वाच्च भाषा वापरणे याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोरील व्यक्ती हा वारंवार एकच बोलत होता, मी अंबानी कुटुंबीयांना मारणार आहे, त्यांना मरावेच लागणार आहे, असं तो फोनवर बोलत होता. पोलिसांनी हे फोन कॉल रेकॉर्ड ऐकले आणि पुढील तपास सुरू केला होता.