Join us  

बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 6:52 PM

मुलुंडमधील हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला नवी मुंबईच्या खारघर परिसरातून मुंबई पोलिसांनी अटक केली.

Mulund Accident : मुंबईत एकीकडे गणरायाचे आगमन होत असतानाच पहाटेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना समोर आली. हिट अँड रन प्रकरणाने मुंबईत आणखी एका तरुणाचा बळी घेतला आहे. मुलुंडमध्ये पहाटे एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बॅनर लावताना भरधाव बीएमडब्लू कारने दोन तरुणांना उडवलं. त्यातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी बीएमडब्लू कारच्या चालकाला अटक करण्यात आलीय. या घटनेनंतर आरोपी हा नवी मुंबई येथे पळून गेला होता. मात्र पोलिसांनी आरोपीला अटक केली.

मुलुंडमध्ये पहाटेच्या सुमारात हिट अँड रनची घटना घडली. या घटनेने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी'मुलुंडचा राजा' या गणेश मंडळावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. मुलुंडमध्ये पहाटे चारच्या सुमारास एका बीएमडबल्यू कारने मुलुंडचा राजा या मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना रस्त्यावर बॅनर लावत असताना जोरदार धडक दिली. या धडकेनंतर कार चालक कार घटनास्थळावरुन पसार झाला. या धडकेत प्रसाद पाटील या तरुणाचा मृत्यू झाला. तर प्रीतम थोरात हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

बीएमडब्लू कारने कँपस हॉटेलकडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात असताना प्रसाद आणि प्रितमला जोरदार धडक दिली. दोघांनाही उडवल्यानंतर कार चालक मदतीसाठी थांबला नाही. त्याने गाडी थेट मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगाने नेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कार चालकाचा शोध  सुरु केला.

मात्र आता या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी शक्ती हरविंदर अलग हा मुलुंडचाच रहिवासी असून कॉल सेंटरला कामाला आहे. शक्ती हरविंदर अलग याच्याच बीएमडबल्यू कारने प्रसाद आणि प्रितमला धडक दिली. शक्तीने त्याची गाडी दुरुस्त केली होती. त्यामुळे ती व्यवस्थित काम करते की नाही हे पाहण्यासाठी त्याने परिसरात फिरवून बघत असताना अपघात झाला. अपघातानंतर गाडी घराजवळ लावून बाइकने त्याने नवी मुंबई गाठली. मात्र तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पोलिसांनी खारघर येथून त्याला अटक केली आहे. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीसअपघात