Mumbai Police: घशात सेफ्टी पिन अडकलेल्या १४ दिवसाच्या बाळासाठी पोलीस बनला देवदूत; बघा काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 03:36 PM2020-06-18T15:36:59+5:302020-06-18T15:39:23+5:30
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, वडाळा येथे राहणाऱ्या कुटुंबातील १४ दिवसाच्या बाळाच्या घशात सेफ्टी पिन अडकली होती.
मुंबई – सध्या कोरोना संकटकाळात आपल्या जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या कोविड योद्धाचं सर्वच स्तरातून कौतुक होतं, या काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसही दिवसरात्र काम करत आहेत. संघर्षात या काळात अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर काहींचा जीवही गेला. पण पोलीस कधीच त्यांच्या कर्तव्यापासून दूर गेले नाहीत.
सध्या मुंबई पोलीस दलातील अशा एका कॉन्स्टेबलचं कौतुक होतं आहे. ज्याच्या प्रसंगावधनामुळे एका १४ दिवसाच्या बाळाला जीवदान मिळालं. १४ दिवसाच्या बाळाच्या घशात सेफ्टी पिन अडकल्याने कासावीस झालेल्या पालकांच्या मदतीला मुंबई पोलीस देवदूत बनवून आला. श्रीमंत कोळेकर असं या पोलीस कॉन्स्टेबलचे नाही आहे. वडाळा ट्रर्मिनल याठिकाणी हा पोलीस कार्यरत आहे.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, वडाळा येथे राहणाऱ्या कुटुंबातील १४ दिवसाच्या बाळाच्या घशात सेफ्टी पिन अडकली होती. त्यामुळे बाळाचा जीव वाचवण्यासाठी पालक कासावीस झाले होते, त्याला तातडीनं वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे होते. त्यावेळी या भागात कार्यरत असणाऱ्या कॉन्स्टेबल श्रीमंत कोळेकर यांना ही माहिती मिळाली. तातडीनं त्यांनी स्वत:च्या मोटारसायकने बाळाला केईएम रुग्णालयात पोहचवले, त्या बाळावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रीमंत कोळेकर यांच्या या कार्याची दखल लोकांना कळावी म्हणून मुंबई पोलिसांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. कॉन्स्टेंबल कोळेकर यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे बाळावर तातडीनं उपचार सुरु झाले. त्यामुळे सोशल मीडियात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वडाळा येथे त्यांच्या १४ दिवसांच्या लहान बाळाच्या घशात सेफ्टी पिन अडकल्याने कासावीस झालेल्या पालकांना बघून वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल श्रीमंत कोळेकर यांनी त्वरित स्वतःच्या मोटर सायकलने त्यांना केईएम रुग्णालयात पोहचवले व इलाजासाठी मदत केली.#MumbaiFirst
— Mumbai Police (@MumbaiPolice) June 18, 2020
काही दिवसांपूर्वीच एका मुंबई पोलिसाने मुलीला रक्तदान केल्याचं दिसून आलं होतं. हिंदुजा रुग्णालयात १४ वर्षांच्या सना फातिम खान हिला अचानक ओपन हार्ट सर्जरीवेळी A+ रक्त तातडीने लागले. मुंबईमध्ये भयंकर चक्रीवादळ व कोरोनामुळे रक्त देण्याकरिता तिच्या कुटुंबातील आणि नातेवाईक कोणीही रुग्णालयात येऊ शकले नव्हतं. अशा गंभीर परिस्तिथीत ऑन ड्युटी असलेले पोलीस शिपाई आकाश बाबासो गायकवाड यांनी काहीही विचार न करता चिमुकलीचा रक्तदान केले. हा योद्धा इतक्या बेताच्या परिस्थितीत फक्त माणुसकी हाच आपला धर्म म्हणून चिमुकलीच्या संकटकाळी वेळीच धाऊन आला आणि रक्तदान करून या मुलीला जीवनदान दिले होते.