मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: दसरा मेळाव्याला दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन झाले. राज्यभरातून लाखोंची गर्दी शिवाजी पार्क, बीकेसीवर धडकली. या चढाओढीत मात्र मुंबई पोलिसांनी बाजी मारल्याचे दिसून आले. दुहेरी ताण असताना काटेकोर नियोजनामुळे सगळे सुरळीत पार पडल्यामुळे ते खरे हीरो ठरले. त्यात पोलिसांना साथ मिळाली वाहतूक पोलीस, रेल्वे पोलीस, तसेच संबंधित सर्व यंत्रणांची.
ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटांकडून एकमेकांवर सोडले जाणारे टीकास्त्र, झटापटीच्या घटना, आयोजनावर न्यायालयात झालेला वाद या पार्श्वभूमीवर दसऱ्याला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान मुंबई पोलिसांसमोर होते. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांच्या विशेष शाखेकडून सतत आढावा घेण्याचे काम सुरू होते. बीकेसीतील मेळाव्याला मुख्यमंत्री, तसेच इतर मंत्री उपस्थित होते, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिकही मेळाव्यासाठी एकत्र येणार असल्याने या ठिकाणीही अनुचित प्रकार घडणार नाही, या दृष्टीने पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला.
असा होता मुंबईत कडेकोट बंदोबस्त
दोन्ही मेळाव्यांना कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून बंदोबस्तासाठी ३२०० अधिकारी, १५ हजार २०० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे १५०० जवान, एक हजार गृहरक्षक दल, शीघ्र कृती दलाची २० पथके, १५ बॉम्ब शोधक व नाशक पथके तैनात करण्यात आली होती. त्यांच्या मदतीला वर्षभरात निवृत्त झालेल्या पोलिसांनीही विशेष पोलीस अधिकारी म्हणून भूमिका बजावली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"