मुंबई - मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे आज सेवानिवृत्त झाले. त्यांची पोलीस सेवेतून निरोपाच्या दिवशी फेसबुक पोस्ट लिहून आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. पोलिस आयुक्त या नात्याने निरोप घेताना कार्यक्षम पोलिस दलाचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली, अशीच भावना माझ्या मनात आहे, असे त्यांनी आपल्या या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.
या पोस्टमध्ये संजय पांडे म्हणाले की, मित्र हो, ३६ वर्षांच्या सेवेनंतर आज सेवानिवृत्त होतोय, गेल्या वर्षभरात आधी पोलिस महासंचालक या नात्याने आणि गेले काही महिने पोलिस आयुक्त या नात्याने आपले नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. या काळात आपल्यासाठी बरेच काही करण्याचा प्रयत्न होता, मात्र अल्प कालावधीमुळे काही गोष्टी राहून गेल्या. जनतेचे संरक्षण करणारे अधिकारी आणि शिपाईच विवंचनेत असतील तर ते लोकांचे प्रश्न सोडवू शकणार नाहीत. त्यामुळे तुमचे प्रश्न सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. किमान आपले म्हणणे वरिष्ठांपर्यंत पोहोचते, असा विश्वास निर्माण करण्यासाठी सामान्य शिपायांनाही माझ्या कार्यालयाचे दरवाजे खुले झाले. त्यामुळे अनेकांच्या अगदी व्यक्तिगत अडचणीही दूर करता आल्या.
महिला आणि एकूणच पोलिस दलातील जवानांचे कामाचे तास आठच असावेत, त्यांच्या बढतीचा प्रश्न मार्गी लागावा, यातून आत्मविश्वासाच्या भावनेने अधिकारी आणि जवानांनी जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावे, असा माझा प्रयत्न राहिला आहे. अर्थात अल्प कालावधीमुळे अनेक प्रश्न आणि समस्यांना मी न्याय देऊ शकलो नाही, याची मला जाणीव आहे आणि त्याबद्दल खंतही आहे. २०दिवसांच्या नैमित्तिक रजेचा प्रश्न तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रेणी रद्द करण्याचा विषय मार्गी लावण्याचे राहून गेले, याची मला जाणीव आहे. त्याचबरोबर भविष्यात हे प्रश्न निश्चितच सुटतील, असा विश्वासही आहे, असे या पोस्टमध्ये म्हटले.
मुख्यतः माझा प्रयत्न पारदर्शी कारभाराचा होता. पोलिस स्टेशनची पायरी चढताना सामान्य माणसाला भीती, शंका न वाटता त्याचा त्याला आधार वाटला पाहिजे, ही माझी भावना होती व आहे. आपण सारेही याच भावनेने भविष्यातही काम कराल आणि त्यामुळे जगात नावलौकिक असलेल्या मुंबईत आणि महाराष्ट्रातही कायमच शांतता आणि सुव्यवस्थेचे वातावरण राहील, असा विश्वास आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पोलिस आयुक्त या नात्याने निरोप घेताना कार्यक्षम पोलिस दलाचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली, अशीच भावना माझ्या मनात आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेबरोबरच आपल्याविषयीही कृतज्ञतेची भावना माझ्या मनात आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.