थरारक VIDEO! एक सेकंद उशीर झाला असता तर...; पोलीस कर्मचाऱ्यामुळे टळला अनर्थ
By कुणाल गवाणकर | Published: January 2, 2021 02:29 PM2021-01-02T14:29:30+5:302021-01-02T14:31:25+5:30
मागचा पुढचा विचार न करता पोलीस कर्मचारी मदतीला धावला; प्रवाशासाठी देवदूत ठरला
मुंबई: रेल्वे रुळ ओलांडू नका, पुलाचा किंवा सबवेचा वापर करा, अशा घोषणा रेल्वे स्थानकांवर सातत्यानं करण्यात येतात. मात्र तरीही नियम मोडून रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांची संख्या कमी नाही. रेल्वे रुळ ओलांडताना दरवर्षी अनेक जण जीव गमावतात. मात्र तरीही कित्येकांना शहाणपण येत नाही. पश्चिम रेल्वेवर काल अशीच एक घटना घडली. एक प्रवासी रेल्वे रुळ ओलांडताना अचानक लोकल आली. मात्र पोलीस कर्मचाऱ्यानं मदतीचा हात दिल्यानं अनर्थ टळला. यावेळी एक सेकंदाचा जरी उशीर झाला असता, तर प्रवाशाचा जीव गेला असता.
दहिसरमध्ये एक ६० वर्षीय व्यक्ती रेल्वे रुळ ओलांडून फलाटावर चढण्याच्या प्रयत्नात होती. मात्र त्या व्यक्तीचा बूट पायातून निघाला. व्यक्तीनं तो बूट उचलून पायात घातला. त्याचवेळी फलाटावर एक पोलीस कर्मचारी आला. रुळावरील व्यक्ती फलाटावर चढण्याचा प्रयत्न करत असताना लोकल आली. लोकलच्या मोटरमननं गाडीचा वेग थोडा कमी केला. मात्र तरीही लोकल रुळावरील प्रवाशाला धडक देणार असंच वाटत होतं. तितक्यात फलाटावर चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला पोलीस कर्मचाऱ्यानं हात देऊन ओढून घेतलं. त्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला.
दहिसरमध्ये रेल्वे रुळ ओलांडताना एक व्यक्ती थोडक्यात बचावली; पोलीस कर्मचाऱ्यानं मदतीचा हात दिल्यानं जीव वाचला https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/XmpoB3vIDK
— Lokmat (@MiLOKMAT) January 2, 2021
पोलीस कर्मचाऱ्यानं मागचा पुढचा कसलाही विचार न करता प्रवाशाला मदतीचा हात दिला. लोकल संबंधित व्यक्तीला धडक देणार इतक्यात पोलिसानं प्रवाशाला वर खेचलं. यावेळी एका सेकंदाचा उशीर प्रवाशाच्या जीवावर बेतला असता. मात्र पोलिसानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाला जीवदान मिळालं. प्रवाशाच्या मदतीला धावलेल्या पोलिसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.