मुंबई : सध्या सर्वत्र मुंबईपोलिसातील जवान संदीप वाकचौरे यांची खूप चर्चा आहे. मृत्यूच्या दारातून वाचलेल्या महिलेला मदत करून वाकचौरे यांनी माणुसकीचे दर्शन केले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका वृद्ध महिलेला मदत केल्याबद्दल मुंबई पोलीस हवालदार संदीप यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅंडलवरून हवालदार संदीप वाकचौरे यांचा एक फोटो शेअर करून त्यांच्या कार्याला दाद दिली. महिलेला रूग्णालयात नेतानाचा संदीप यांचा फोटो मुंबई पोलिसांनी शेअर केला आहे. ६२ वर्षीय महिला आपल्या पतीला भेटण्यासाठी जात असताना रस्ता ओलांडताना एका दुचाकीने तिला धडक दिली. हे पाहून घटनास्थळी उपस्थित असलेले वाकचौरे यांनी मदतीसाठी धाव घेतली अन् रूग्णवाहिकेची वाट न पाहता जखमी महिलेला उचलून रूग्णालयात नेले. मुंबई पोलिसातील या हवालदाराच्या धाडसानं सर्वांची मनं जिंकली.
मुंबई पोलिसांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "नेहमीच ड्युटीवर! १६ ऑगस्ट रोजी पतीला रुग्णालयात भेटण्यासाठी जाणाऱ्या ६२ वर्षीय महिलेला रस्ता ओलांडताना दुचाकीने धडक दिली. मग ड्युटीवर असलेले हवालदार संदीप वाकचोरे यांनी तातडीने त्यांच्या मदतीला धाव घेतली आणि रुग्णवाहिकेची वाट न पाहता त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले."
संदीप यांच्या कार्याला सलाम
हवालदार संदीप वाकचौरे यांच्या धाडसामुळे एका महिलेचा जीव वाचला. वेळीच उपचार झाल्याने गंभीर दुखापत झालेल्या महिलेची प्रकृती सुधारली. नागरिकांसह सोशल मीडियावरील युजर्स देखील संदीप या हवालदाराचे तोंडभरून कौतुक करत आहेत.