मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट करू; पोलिसांना आलेल्या कॉलने खळबळ, अज्ञात व्यक्तीने मागितली रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 03:07 PM2023-06-23T15:07:03+5:302023-06-23T15:07:32+5:30
Bomb Blast Threat Call : मुंबईसह पुण्यातील अनेक भागांमध्ये बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी अज्ञात व्यक्तीने दिली असून मुंबई पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.
Bomb Blast Threat Call TO Mumbai Police | मुंबई: मुंबई पोलिसांना आलेल्या एका फोनने राज्याचे लक्ष वेधले आहे. मुंबईसह पुण्यातील अनेक भागांमध्ये बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी अज्ञात व्यक्तीने दिली असून मुंबई पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला भागात आरोपीकडून सायंकाळी साडे सहा वाजता स्फोट घडवून आणणार असल्याची धमकी दिली आहे.
मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला २२ जून रोजी एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला. मुंबई आणि पुण्यात २४ जून रोजी स्फोट करणार असल्याचे आरोपीने म्हटले आहे. तसेच कॉलरने स्फोट थांबवण्यासाठी २ लाख रुपयांची मागणी देखील केली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. फोन करणाऱ्याची माहिती मिळाली असून तो उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी आहे. आयपीसीच्या कलम ५०५ (१) (बी), ५०५ (२) आणि १८५ नुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Maharashtra | Mumbai Police control room received a call from an unidentified person on June 22 about blowing up Mumbai (Andheri and Kurla West Area) and Pune on June 24. The caller also demanded Rs 2 lakh to stop the blast. The caller is identified as a resident of Jaunpur in…
— ANI (@ANI) June 23, 2023
उद्या बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी
अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या धमकीनंतर दोन्हीही शहरातील पोलीस यंत्रणा अलर्टवर असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. माहितीनुसार, काल मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला अज्ञात व्यक्तीने फोन करत बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याची धमकी दिली. तसेच उद्या म्हणजेच शनिवारी दुपारी मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला या भागांमध्ये बॉम्बस्फोट होईल असेही त्याने सांगितले. या धमकीनंतर अंधेरी आणि कुर्ला या भागांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
स्फोट घडवण्यासाठी मिळाले २ कोटी
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला काल म्हणजेच गुरूवारी एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याला दोन लाख रुपयांची गरज असून ही रक्कम मिळाल्यास तो मुंबई किंवा पुण्यातील नियोजित बॉम्बस्फोट थांबवू शकतो, असे त्याने सांगितले आहे. तसेच हा बॉम्बस्फोट घडवण्यासाठी त्याला दोन कोटी रुपये मिळाल्याचेही आरोपीने सांगितले आहे. दरम्यान, जर दोन लाख रूपये मिळाल्यास तो निकटवर्तीयांसह विदेशात रवाना होणार असल्याचे अज्ञात आरोपीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला सांगितले आहे.