लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळात विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध पालिकेबरोबर पोलिसांकडूनही धडक कारवाई सुरू झाली आहे. तीन दिवसांत पोलिसांनी अशा १८ हजार जणांवर कारवाई करून दंड वसूल केला.
पोलिसांकडून गर्दीची ठिकाणे, बाजार, पर्यटनस्थळ, रेल्वे, बसस्थानक तसेच रहिवासी इमारतींसह झोपडपट्टी भागात विनामास्क फिरणाऱ्यांची धरपकड सुरू आहे. यात, त्यांच्याकडून २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे. रविवारपासून पोलिसांनी या कारवाईला सुरुवात केली. यात एकूण १८ हजार जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.
* अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
कारवाई सुरू असताना मुंबईत विनामास्क फिरल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल अशा अफवा सोशल मीडियावर पसरविल्या जात आहेत. मात्र विनामास्क आढळल्यास केवळ २०० रुपये दंड आकारला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
* दंड वसुलीतील अर्धी रक्कम पोलीस कल्याण निधीसाठी
कारवाईदरम्यान वसूल केलेल्या दंडाच्या रकमेतून अर्धे पैसे पोलीस कल्याण निधीसाठी देण्यात येणार आहेत.
..................