६५ अधिकाऱ्यांच्या बदल्या, आतापर्यंतचे सर्वात मोठे बदल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सचिन वाझे प्रकरणांनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. प्रथमच गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी करण्यात आली आहे. यात एनआयए आणि एटीएसच्या चौकशीत अडकलेले एपीआय रियाजुद्दीन काझी यांची सशस्त्र पोलीस दलात तर प्रकाश ओव्हाळ यांची मलबार हिल पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटके असलेल्या कार प्रकरणात वाझे एनआयएच्या कोठडीत आहेत. त्या कारचे मालक मनसुख हिरन यांच्या हत्येच्या कटातही ते मुख्य आरोपी आहेत. वाझे यांना पोलीस खात्यात परत घेण्यापासून ते त्यांच्याकडे गुन्हे शाखेतील महत्त्वाचा गुन्हेगारी गुप्तचर विभाग देऊन मोठ्या गुन्ह्यांचा तपास देण्यापर्यंत घडलेल्या सर्वच बाबी संशयाच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. त्यात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपामुळे पोलीस दलात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारांबे, अपर पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक सोमवारी पार पडली. गुन्हे शाखेत ८ ते १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक आणि अन्य अंमलदार, तसेच ३ ते ५ वर्षे गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षकांच्या याद्या तयार करून त्यांच्या बदल्यांबाबत चर्चा झाली.
या बैठकीनंतर मंगळवारी रात्री मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. यात गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बदल्यांमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
रियाज काझी सशस्त्र पोलीस दलात
सचिन वाझे यांच्यासोबत कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी आणि प्रकाश ओव्हाळ यांची राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) चौकशी करत आहे. काझी यांची सशस्त्र पोलीस दलात तर ओव्हाळ यांची मलबार हिल पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
यांची होऊ शकते गुन्हे शाखेत बदली
पोलीस निरीक्षकपदी बढती मिळून मुंबई पोलीस दलात नियुक्ती झालेले अधिकारी आणि नवीन इच्छुकांना गुन्हे शाखेत काम करण्याची संधी देण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.