अत्याधुनिक उपकरणांसह मुंबई पोलीस सज्ज, पोलीस आयुक्तांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 07:14 AM2019-11-26T07:14:19+5:302019-11-26T07:14:29+5:30
समुद्रमार्गे प्रवेश करत १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मायानगरी मुंबईला लक्ष्य केले होते. या दहशतवादी हल्ल्याला आज ११ वर्षे पूर्ण झाली.
मुंबई : समुद्रमार्गे प्रवेश करत १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मायानगरी मुंबईला लक्ष्य केले होते. या दहशतवादी हल्ल्याला आज ११ वर्षे पूर्ण झाली. मात्र, आजही शहरावरील दहशतवादाचे सावट कायम आहे. मात्र, भविष्यात अशा प्रकारचा कुठलाही धोका उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांसह मुंबई पोलीस सज्ज आहेत, असे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सांगितले.
२६/११च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ३४ विदेशी नागरिकांसह १६६ जणांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे ७०० जण जखमी झाले होते. प्राणाची पर्वा न करता दहशतवाद्यांविरोधात लढत पोलिसांनी ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले तर अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडले होते. त्याला फासावर चढविण्यात तपास यंत्रणांना यश आले. या हल्ल्यात १८ पोलीस शहीद झाले. आज या हल्ल्याला ११ वर्षे पूर्ण झाली असली तरी त्याच्या स्मृती अजूनही ताज्या आहेत. दहशतवादाचे सावट कायम आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय ५ हजार सीसीटीव्हींद्वारे मुंबईतल्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
बर्वे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विधान भवनासह मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सर्वच ठिकाणी स्वत: जाऊन सुरक्षेचा आढावा घेतला. भविष्यात शहराला कधीही अशा प्रकारचा धोका उद्भवू नये, यासाठी शीघ्र कृती दलाला (क्विक रिस्पॉन्स टीम - क्यूआरटी) प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
भूतकाळातील घटनांवरून धडा घेत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि अत्याधुनिक उपकरणांच्या आधारे मुंबई पोलीस दल सज्ज असल्याचेही बर्वे यांनी नमूद केले.
मुंबईकर हे कायद्याची अंमलबजावणी करणाºया, तपास यंत्रणेच्या डोळ्यांची आणि कानांची भूमिका बजावत आहेत, त्यामुळे आम्हाला संशयास्पद व्यक्ती आणि वस्तूबाबत तत्काळ माहिती मिळत आहे. नागरिकांमधील हा बदल कौतुकास्पद असल्याचेही बर्वे यांनी सांगितले. जेव्हा हवाई देखरेखीची आवश्यकता भासते, तेव्हा मुंबई पोलीस हे ड्रोन युनिट तैनात करतात आणि ड्रोन-विरोधी यंत्रणा (मानव रहित हवाई वाहनांवरील) अशा प्रकारचे हल्ले रोखण्यास उपयोगी ठरतात, असेही ते म्हणाले.
सागरी सुरक्षा भक्कम करण्यावर भर
राज्यातील अन्य तपास यंत्रणांशी समन्वय वाढविण्यात आला आहे. शहराच्या समुद्र किनाऱ्यांवरील तसेच समुद्रातील पोलीस गस्तीमध्ये वेळोवेळी चांगले बदल करत भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाच्या मदतीने सागरी सुरक्षा भक्कम करण्यावर भर दिला आहे.
शहरातील सर्व यंत्रणांना सतर्क ठेवण्यासाठी वेळोवेळी मॉकड्रिल घेण्यासोबत आॅपरेशन कवचसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुंबई पोलीस समुद्री मार्गाने होणारे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी तटरक्षक दलासोबत असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.