Join us

१२,८९९ पोलिस हवे आहेत मुंबई पोलिस दलाला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 10:36 AM

मुंबई पोलिसांत तब्बल १२ हजार ८९९ पदे रिक्त असल्याची माहिती, माहिती अधिकाराच्या माध्यमातून पुढे आली आहे.

मुंबई : मुंबईसारख्या अजस्त्र शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी एकीकडे पोलिस दिवसरात्र मेहनत करत आहेत. मात्र, दुसरीकडे मुंबई पोलिसांत तब्बल १२ हजार ८९९ पदे रिक्त असल्याची माहिती, माहिती अधिकाराच्या माध्यमातून पुढे आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करत सद्यस्थितीत मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती मागितली होती. मुंबई पोलिस आयुक्तालयाचे सहायक पोलिस आयुक्त विनोद कांबळे यांनी अनिल गलगली यांना ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंतची माहिती दिली आहे. एकूण मंजूर पदांची संख्या ५१,३०८ आहे. 

 यात ३८,४०९ कार्यरत पदे असून, १२,८९९ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, रिक्त असलेल्या पदांमध्ये अपर पोलिस आयुक्तपदापासून शिपाई पदापर्यंत १२ हजार ८९९ पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे.

सर्वाधिक रिक्त पदे पोलिस अंमलदारांची :

पोलिस अंमलदारांची २८,९३८ पदे मंजूर आहेत. यापैकी १७,८२३ कार्यरत पदे असून, ११,११५ पदे रिक्त आहेत. पोलिस उपनिरीक्षकांची ३,५४३ पदे मंजूर असताना फक्त २,३१८ कार्यरत पदे असून, १,२२५ पदे रिक्त आहेत. पोलिस निरीक्षक १,०९० मंजूर पदे असून, यापैकी ३१३ पदे रिक्त आहेत. सध्या ९७७ कार्यरत पदे आहेत. सहायक पोलिस आयुक्तांची १४१ पैकी २९ पदे रिक्त आहेत. पोलिस उपायुक्त यांची ४३ पदे मंजूर असून, ३९ पदे कार्यरत आहेत. यात ४ पदे रिक्त आहेत, तर अपर पोलिस आयुक्त यांचे १२ पैकी फक्त १ पद रिक्त आहे.

टॅग्स :मुंबई पोलीस