Join us

मुंबई पोलीस दलात आता १२/२४ तासचा फॉर्म्युला, पोलिसांना 'आराम' मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 2:35 PM

मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय, पोलिसांना दिलासा

मनीषा म्हात्रे 

मुंबई : कोरोनाने मुंबई पोलीस दलातील ३ बळी घेतल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यात पहिल्या टप्प्यात ५५ वर्षीय पोलिसांबरोबर  मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या ५२ वर्षीय पोलिसांना घरी राहण्याच्या सूचना मंगळवारी देण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईत १२ तास सेवा बजावल्यानंतर २४ तास आरामाचा फॉर्म्युलाही ३ मे पर्यन्त लागू करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मुंबई पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. कोरोनामुळे तीन दिवसांत ५० वर्ष उलटलेल्या ३ पोलिसांचा बळी गेला. तर मुंबईत ४० हून अधिक कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबईत कर्तव्य बजावणाऱ्यांना उपचारासाठीही वणवण होत असल्याने पोलीस दलात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.         मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ५५ वर्षीय पोलिसांना घरी थांबण्याच्या महिन्याभरापूर्वी तोंडीच सूचना दिल्यामुळे याकडे दुर्लक्ष झाले होते. त्याचेच दुष्पपरिणाम की काय तीन पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. हेच आदेश लेखी दिले असते तर याची अंमलबजावणी प्रभारीकडून झाली असती असाही सूर काही पोलिसांकडून येत आहे. तिघांच्या मृत्यूनंतर सोमवारपासूनच वाहतूक पोलिसांसह विविध शाखातील पोलिसांनी या सुचनांची अंमलबजावणी करत पन्नास वर्षे उलटलेल्या पोलिसांना सुट्टी देण्यास सुरुवात केली होती. अशातच मंगळवारी मुंबई पोलीस प्रवक्ते प्राणय अशोक यांनी याबाबत लेखी निर्देश जारी केले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ५५ वर्षावरील पोलिसांसह  मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या ५२ वर्षीय पोलिसांना घरी राहण्यास सांगितले आहे. 

तर ३ मे पर्यन्त लॉकडाऊनच्या काळात पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना १२ तास सेवा आणि २४ तास आराम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुर्वी लोकमतने पोलिसांच्या व्यथा मांडताना या फॉर्म्युलाबाबत मागणी वाढतेय असे नमूद केले होते. त्यानुसार काही पोलीस ठाण्यात कामही सुरु करण्यात आले. मनुष्यबळाअभावी काही दिवसातच ही पद्धत गुंडाळावी  लागली  होती. मात्र याबाबत लेखी आदेश जारी करण्यात आल्याने पोलिसांना दिलासा मिळाला आहे. तसेच पोलिसांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एचसीक्यूच्या गोळ्या देण्यात येत आहे.  पोलिसांची रोग प्रतिकारशक्ती  बळकट करण्यासाठी २० हजार पोलिसांना  मल्टीविटामिन आणि प्रोटीनयुक्त आहार पुरविला जात आहे. पोलिसांसाठी शक्य तितके प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद करत, शासनाकडून कोरोना विरुद्धचा लढ्यात जीव गमावणाऱ्या पोलिसांना पन्नास लाखांची मदत देण्यात येत आहे असल्याचे प्रणय अशोक यांनी नमूद केले.

पोलिसांसाठी कोवीड रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था

पोलिसांच्या आरोग्याबाबत होत असलेली हेळसांड लक्षात घेता, त्यांच्यासाठी सर्व कोवीड रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियासाठी हेल्पलाईनद्वारे कोरोनासंबंधित शंका  किंवा अडचणी दूर करण्यासाठी नियंत्रण कक्षात पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियांकरिता विशेष कोविड हेल्पलाईन क्रमांक तयार केला आहे.  सर्व कर्मचार्‍यांना पुरेशा प्रमाणात पीपीई, फेस मास्क, हँड सॅनिटायझर्स, हातमोजे, चेहरा शिल्ड पुरविल्या गेल्या आहे.  तसेच खाद्यपदार्थांची पाकिटे, रेशन, गरम  पाणी बंदोबस्तावरील पोलिसांनाही पुरविण्यात येत आहे. 

टॅग्स :मुंबईपोलिसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस