Join us

शेअरमध्ये पैसा लावताय? सावधान...पोलिसांची जागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 10:39 AM

सोशल मीडियावर शेअर्स ट्रेडिंगबाबत फिरत असलेली जाहिरात बघून त्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवणे अनेकांना महागात पडत आहे.

मुंबई : सोशल मीडियावर शेअर्स ट्रेडिंगबाबत फिरत असलेली जाहिरात बघून त्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवणे अनेकांना महागात पडत आहे. त्यामुळे दुप्पट, तिप्पट नफा मिळण्याच्या आमिषाला बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन मुंबईपोलिसांनी केले आहे. याबाबतचा जनजागृती करणारा व्हिडीओ देखील शेअर करण्यात येत आहे.

मुलुंड परिसरात कुटुंबासोबत राहत असलेले ४६ वर्षीय तक्रारदार हे एका नामांकित आयटी कंपनीत वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. इन्स्टाग्रामवर सर्फिंग करताना त्यांना एक ऑनलाइन ट्रेडिंग टिप्स देतो असा दावा करणारी जाहिरात दिसली. तक्रारदार यांनी उत्सुकतेपोटी दिलेल्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर  ते एका व्हॉट्सॲप ग्रुपशी जोडले गेले. हा ग्रुप रामा आणि त्याची सहायक मीरा चालवत होती. ग्रुपवर येणाऱ्या शेअर मार्केटच्या सूचना बघून ते शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करू लागले. पुढे मीराने चांगले प्राॅफिट मिळवून देण्याचे आमिष दाखवून एक लिंक पाठवून खाते उघडले. या खात्यात जमा केलेली रक्कम शेअर्स ट्रेडिंगसाठी वापरण्यात येणार असून मिळणारा फायदा खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. विश्वास ठेऊन तक्रारदार यांनी गुंतवणूक केली. तक्रारदार यांनी १५ ऑक्टोबर ते ६ डिसेंबर या काळात एकूण ९ लाख ३७ हजार ७५० रुपये गुंतवणूक केली होती.

तक्रारदार यांना १७१८२२.९२ यूएस डाॅलर्स एवढी रक्कम प्रॉफिटसह दिसत होती. त्यांनी ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडे पैसे काढण्यासाठी एकूण रकमेच्या पाच टक्के रक्कम आगाऊ भरावी लागेल असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना संशय आला. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने तक्रारदार यांनी रक्कम भरण्यास नकार देत मुलुंड पोलिस ठाणे गाठून या फसवणुकीची तक्रार दिली आहे. अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक होत आहे.

आमिषाला बळी पडू नका-

१) उत्तर प्रादेशिक सायबर विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आकर्षक नफ्याचे आमिष दाखवून शेअर्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले जाते. 

२) याच गुंतवणुकीच्या नादात नागरिकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. सतर्क होऊन व्यवहार करा. कुणाची फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :मुंबईसायबर क्राइमपोलिस