मुंबई : मुंबईतील खार परिसरातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात दोन तरुण रस्त्याच्या मधोमध सर्वांसमोर कोरियन तरुणीची खुलेआम छेड काढत आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे. माहितीनुसार, ही तरूणी साउथ कोरिया येथील आहे. लाईव्ह स्ट्रिमिंग दरम्यान दोन तरुणांनी तिच्यासोबत आक्षेपार्ह कृत्य केल्याचा आरोप तिने केला आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली असल्याचे सांगितले जात आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळत आहे की, दोन तरूण तिला वारंवार चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहेत. एका तरुणाने कोरियन तरुणीचा हात धरून तिचे चुंबन घेण्याचा देखील प्रयत्न केला. यावर तरुणीने कडक शब्दात त्याला दूर राहण्यास सांगितले. मग ती पुढे चालायला लागली. तरीदेखील दोन्ही तरुण मागून स्कूटीवर येतात आणि तिला लिफ्ट देण्याचा प्रयत्न करतात. खरं तर ही मुलगी तिच्या यूट्यूब चॅनेलसाठी लाईव्ह स्ट्रीमिंग करत होती.
मुंबई पोलिसांचे मानले आभार या घटनेनंतर घाबरलेल्या तरूणीने रात्री ट्विट करून आरोपींवर कारवाईची मागणी केली. संबंधित तरूणीने मुंबई पोलिसांना मेन्शन करून ही बाब सर्वांसमोर आणली. पोलिसांनी आरोपींवर कारवाई केल्यानंतर या तरूणीने मुंबई पोलिसांचे आभार मानले. तरूणीने म्हटले, अशा प्रकारची घटना जगात कुठेही घडू शकते. ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत प्रवास करत आहे. ही फक्त एक घटना आहे, भारतासह इतर देशांतील लोकही मदतीसाठी पुढे आले, मी मुंबई पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे खूप खुश आहे. मी सर्वांचे आभार मानते."
आरोपींना मुंबई पोलिसांनी केली अटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबीन चंद मोहम्मद शेख वय 19 आणि मोहम्मद नकीब सदरेलम अन्सारी वय 20 यांनी मुंबईत लाईव्ह स्ट्रिमिंग दरम्यान एका कोरियन महिलेचा छळ केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. मात्र पीडित मुलीच्या वतीने ही तक्रार अधिकृतपणे नोंदवण्यात आलेली नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"