बॅगेत मित्राचा मृतदेह, दादरहून ट्रेन पकडण्याचा प्रयत्न अन्...; हत्याप्रकरणात दुबई कनेक्शन समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 05:54 PM2024-08-06T17:54:40+5:302024-08-06T18:07:37+5:30

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर सोमवारी बॅगेत मृतदेह घेऊन जाणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Mumbai Police has arrested two people who were carrying dead bodies in bags at Dadar station | बॅगेत मित्राचा मृतदेह, दादरहून ट्रेन पकडण्याचा प्रयत्न अन्...; हत्याप्रकरणात दुबई कनेक्शन समोर

बॅगेत मित्राचा मृतदेह, दादरहून ट्रेन पकडण्याचा प्रयत्न अन्...; हत्याप्रकरणात दुबई कनेक्शन समोर

Mumbai Crime : मध्य रेल्वेच्या नेहमीच गजबजलेल्या दादर स्थानकावर सोमवारी एका बॅगेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. दादर स्टेशनच्या फलाट क्रमांक ११ वर दोघेजण एक जड बॅग घेऊन तुतारी एक्स्प्रेमध्ये चढण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांच्या नजरेतून ते सुटले नाहीत. पोलिसांनी चार तासात बॅगेत मृतदेह घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बॅगेत ज्या व्यक्तीचा मृतदेह होता तो दोन्ही आरोपींचा मित्र असल्याचे समोर आलं आहे.

दादरच्या फलाट क्रमांक ११ वर दोन मूकबधिर व्यक्ती तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात होते. एक बॅग ट्रेनमध्ये चढवताना दोघांची खूप दमछाक होत होती. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोष कुमार यादव आणि माधव केंद्रे यांना दोघांवरही संशय आला. त्यामुळे पोलिसांनी दोघांना थांबवले आणि बॅग उघडून दाखवण्यास सांगितले. बॅग उघडताच पोलिसांना आणि आजूबाजूच्या लोकांना जबर धक्का बसला.  बॅगेत रक्ताने माखलेला एक मृतदेह होता. या मृत व्यक्तीच्या डोक्यावर गंभीर जखम होती. इतक्यात त्यातील एक व्यक्ती पळून गेली आणि दुसऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याकडून माहिती घेत पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला उल्हासनगर येथून अटक केली आहे.

अर्शद अली सादिक शेख असे मृत व्यक्तीचे नाव असून तो आरोपी शिवजीत सिंह आणि जय चावडा यांचा मित्र होता. शिवजीत आणि जय चावडाने अर्शद अलीची हत्या करुन त्याचा मृतदेह सूटकेस बॅगमध्ये भरला होता. मृतदेह बॅगेत भरुन तुतारी एक्स्प्रेसने कोकणात नेणार होते आणि तिथे त्याची विल्हेवाट लावणार होते. मात्र दादर स्थानकावरच त्यांचा डाव फसला आणि दोघेही पोलिसांच्या तावडीत सापडले. अर्शद अलीच्या हत्येप्रकरणी जय चावडा याचा सहकारी आणि मुख्य आरोपी सुरजीत सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे.

कशासाठी केली हत्या?

मुंबईत राहणाऱ्या शिवजीत सिंग आणि जय चावडा या दोघांनी त्यांचा मित्र अर्शद अली शेख याच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्याची हत्या केली. तिघेही मूकबधिर असून जुने मित्र होते. शिवजीत सिंग आणि जय चावडा यांनी अर्शद अली शेखला रविवारी जय चावडा यांच्या घरी बोलावले होते. तिघेही मिळून दारू प्यायले आणि अचानक त्यांच्यात काही कारणावरून भांडण झाले. यानंतर जय चावडा आणि शिवजीत सिंग यांनी अर्शद अलीची हत्या केली.

दरम्यान, अर्शद अली शेखच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, दुबईत बसलेल्या कोणीतरी अर्शदच्या हत्येची सुपारी दिली होती. त्याच्या सांगण्यावरूनच हा खून झाला. मात्र, खुनाचे कारण पोलीस तपासत आहेत. आरोपी सातत्याने आपला जबाब बदलत असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे हत्येचे खरे कारण शोधण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.
 

Web Title: Mumbai Police has arrested two people who were carrying dead bodies in bags at Dadar station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.