मुंबई: कोठडीत असताना पोलिसांनी पाणीही दिलं नाही, असा आरोप करून थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडीओ मुंबई पोलीस आयुक्तांनी ट्विट केला आहे. यामध्ये राणा दाम्पत्य पोलीस ठाण्यात चहा पित असताना दिसत होते. त्यानंतर आता नवनीत राणांनी कोठडीत असताना एका अधिकाऱ्याच्या केबिनमधील वॉशरुम देखील वापरण्यासाठी दिलं होतं, असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.
सांताक्रूझ येथील कोठडीत पोलिसांनी मला पाणी दिलं नाही, वॉशरुमला देखील जाऊ दिले नाही, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. या आरोपावर मुंबई पोलिसांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. नवनीत राणा यांना कोठडीत असताना बिसलेरीचं पाणी देण्यात आलं. त्या वेळचे फोटोग्राफ्स देखील काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
इतकेच नाही तर लॉकअपच्या आवारात असलेल्या एका अधिकाऱ्याच्या कॅबिनमधील वॉशरुम देखील नवनीत राणा यांना वापरण्यासाठी दिले होते. हे सगळं कॅमेऱ्यात कैद झालं, असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. तसेच यासंदर्भात एक अहवाल मुंबई पोलिसांनी राज्य सरकारला दिला आहे.
नवनीत राणांवर कारवाई होणार?
अनुसूचित जातीची असल्यानं मला पाणी दिलं नाही, वॉशरुमही वापरू दिलं नाही, असे गंभीर आरोप राणांनी केले. यासंदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवलं. मात्र राणांचा आरोप खोटा असल्याचं पोलीस आयुक्त संजय पांडेंनी एक व्हिडिओ ट्विट करुन सांगितलं. त्यामुळे आता पोलिसांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी राणा यांच्याविरोधात तक्रार दाखल होऊ शकते. तशी तयारी पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.
संजय पांडेंचं पुराव्यासकट उत्तर- शिवसेनेचे नेते संजय राऊत
संजय पांडेंनी व्हिडीओ ट्विट करुन नवनीत राणांनी केलेल्या आरोपावर एकप्रकारे उत्तरच दिलं आहे. यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. बिनबुडाच्या आरोपांना संजय पांडेंनी पुराव्यासकट उत्तर दिलं. देशाने संजय पांडेंचे आभार मानले पाहिजे. मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं काम सध्या सुरु आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
राणा दाम्पत्याचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा दावा देखील संजय राऊतांनी केला आहे. तसेच त्यांच्या जात प्रमाणपत्राची चौकशी करावी अशी मागणीदेखील संजय राऊतांनी केली आहे. त्याशिवाय, राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवलेले आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्यांनी मुंबई पोलीस दलावर खोटे आरोप लावणे चुकीचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.