लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या काही दिवसांत रस्त्यावर तलवारीने केक कापून त्याचे व्हिडीओ व्हायरल करण्याचे प्रकार वाढले आहेत, तसेच काही ठिकाणी हातात तलवारी घेऊन परिसरात दहशत पसरविण्याचाही प्रयत्न होतानाही दिसतो आहे. मात्र, आता हे प्रकार रोखण्यासाठी मुंबईपोलिसांकडून तलवारीसह विविध शस्त्रे अवैधरीत्या बाळगणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी ऑल आउट ऑपरेशनदरम्यान आरोपींची धरपकड देखील सुरू केली आहे. त्यात रस्त्यावर तलवारीने केक कापणाऱ्यांविरोधातही गुन्हा नोंदवत पोलीस आरोपींचा शोध सुरू करणार आहेत.
तत्काळ कारवाईने बसला चाप-
१) सोशल मीडियावर काही जण हातात तलवारी, कट्टा, चाकू घेऊन त्याचे व्हिडीओ व्हायरल करून दहशत निर्माण करतात.
२) मात्र, मुंबई पोलिसांकडून अशी घटना समोर येताच तत्काळ कारवाई करण्यात येत असल्याने त्यावर चाप बसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
लाइक, शेअर केले तरी कारवाई-
सोशल मीडियावरील सर्व हालचालींवर पोलिसांचे विशेष लक्ष असून, गुंडागर्दीचा व्हिडीओ लाइक आणि शेअर करून त्याला प्रोत्साहन देणाऱ्याविरुद्धही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कोणावर होणार कारवाई?
१) सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी संपूर्ण मुंबईमध्ये पोलिसांकडून शस्त्रास्त्रे, स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत वेळोवेळी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येतात.
२) या आदेशानुसार शस्त्रे, अग्निशस्त्रे, बटन, तेलवासा भाल, दडुके, साटे, बिना परवाना बंदुका, चाकू, काठ्या किंवा लाठ्या किंवा इतर कोणतीही वस्तू जी शारीरिक हानी (हिंसा) करण्यासाठी वापरली जाऊ शकते, ते बाळगण्यावर मनाई करण्यात आली आहे.
३) बंदुकीचे परवानाधारक किंवा सक्षम प्राधिकाऱ्याकडून अशी शस्त्रे वाहून नेण्यासाठी विशिष्ट परवानगी असलेल्यांना यातून वगळण्यात आले आहे.