मुंबई: वाहतूक कोंडीत अडकल्यावर मनस्तापाला सामोरं जावं लागतं. त्यात आसपास असणारे वाहन चालक हॉर्न वाजवू लागल्यावर मनस्ताप आणखी वाढतो. याशिवाय ध्वनी प्रदूषणामुळे इतर समस्यादेखील निर्माण होतात. यावर आता मुंबई पोलिसांनी भन्नाट तोडगा शोधून काढला आहे. यामुळे सिग्नलवर विनाकारण हॉर्न वाजवणं थांबेल, अशी अपेक्षा आहे.मुंबई पोलिसांनी सिग्नल परिसरात आवाज मोजणारी यंत्रणा लावली आहे. याबद्दलचा एक व्हिडीओ मुंबई पोलिसांनी ट्विट केला आहे. यामध्ये सिग्नल परिसरात असणाऱ्या दुभाजकावर असणारी यंत्रणा हॉर्नच्या आवाजाची तीव्रता मोजताना दिसत आहे. वाहन चालकांकडून वाजवण्यात येणाऱ्या हॉर्नची तीव्रता ८५ डेसिबलपेक्षा जास्त असल्यास सिग्नल रिसेट होतो. त्यामुळे वाहन चालकांना जास्त वेळ सिग्नलवर जास्त वेळ थांबावं लागतं. सिग्नलवर मोठमोठ्यानं हॉर्न वाजवण्यापेक्षा संयम ठेवून सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहणं, हे वाहन चालकांना शिकवण्यासाठी पोलिसांनी हा प्रयोग केला आहे.
आवाज खाली! मुंबईकरांनो, आता सिग्नलवर मोठ्यानं हॉर्न वाजवाल, तर याद राखा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 3:26 PM