मुंबई पोलिसांना 'मुंबईच्या राजा'च्या आरतीचा मान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 07:14 PM2019-08-29T19:14:47+5:302019-08-29T19:18:17+5:30
सामाजिक बांधिलकी जपत या मंडळाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मुंबई पोलिसांना आरतीचा मान दिला.
मुंबई - गणपती बाप्पाचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून अनेक सार्वजनिक मंडळांनी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. लालबाग म्हणजे गणेशोत्सवातलं महत्वाचं ठिकाण. गणेशोत्सव काळात लालबाग गणेश भक्तांनी फुलून जातं ते लालबागमधील गणेशगल्ली, तेजुकाया मेन्शन, हिरामणी मार्केट, नरेपार्क, लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी. यंदा गणेशगल्ली येथील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ अर्थात मुंबईचा राजा या मंडळाचं ९२ वे वर्ष असून सामाजिक बांधिलकी जपत या मंडळाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मुंबई पोलिसांना आरतीचा मान दिला. मंगळवार, १० सप्टेंबर रोजी हा आरतीचा मान मंडळाने दिला असल्याची माहिती मंडळाचे सरचिटणीस स्वप्नील परब यांनी दिली.
भव्यदिव्य सजावट आणि उंच गणेशमूर्तीसाठी प्रख्यात असलेले लालबागमधील गणेशगल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ. ह्यावर्षी या मंडळाने उत्तरप्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. या भव्य अशा देखाव्यात रामस्वरूपातील बाप्पाचे दर्शन गणेशगल्लीत भाविकांना घेता येणार आहे. २२ फुटी ही गणपतीची मूर्ती असून गेल्या काही वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत या मंडळाने समाजातील अनेक स्तरांवर राबणाऱ्या हातांना आरतीचा मान दिला आहे. तसेच यंदा सातारा, सांगली , कोल्हापूर येथे पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसांसह एनडीआरएफच्या जवानांनी मदतीचा हात देऊन अनेकांचे जीव वाचविले. त्यामुळे एनडीआरएफच्या पथकास देखील ८ सप्टेंबर रोजी या मंडळाने आरतीचा मान दिला आहे. गेणशोत्सवात १० दिवसच नाही तर प्रत्येक सणासुदीच्या दिवशी रस्त्यावर आपल्या सुरक्षेसाठी उतरतो तो मुंबई पोलीस. त्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत. त्यांना आरतीचा मान देणं म्हणजे आमच्या मंडळासाठी अतिशय महत्वाची गोष्ट असल्याचे मंडळाचे पदाधिकारी संदीप सावंत यांनी सांगितले.