मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने - परमबीर सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 05:51 AM2020-08-04T05:51:02+5:302020-08-04T05:51:28+5:30
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण; बिहार पोलिसांनी गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करायला हवा
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून, बिहार पोलिसांनी गुन्हा आमच्याकडे वर्ग करायला हवा होता, असे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितले. बिहार पोलिसांच्या तपासाबाबत कायदेशीर सल्ला घेत पुढील कारवाई करू, असेही स्पष्ट केले.
मुंबई पोलीस आयुक्त सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जूनला सुशांतच्या अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू झाला. फॉरेन्सिक एक्स्पर्ट, डॉक्टरांच्या पथकाचा सल्ला घेण्यात आला. आतापर्यंत ५६ जणांचे जबाब नोंदविले. व्यावसायिक वैर, आर्थिक व्यवहार किंवा आरोग्य अशा सर्व मुद्द्यांवरून तपास सुरू आहे. सुशांत दुभंगलेले व्यक्तिमत्त्व (ु्रस्रङ्म’ं१ ्िर२ङ्म१ीि१) या मानसिक आजाराने त्रस्त होता. त्यासाठी उपचार घेत होता. तसेच १३, १४ जूनचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेजही आम्ही जप्त केले आहे. यात आत्महत्येपूर्वी पार्टी झाल्याचा एकही पुरावा नाही. सखोल तपास सुरू आहे.
१६ जूनला सुशांतचे वडील, ३ बहिणी, मेहुण्याचा जबाब नोंदवला. त्यांनी कुणाबद्दल संशय व्यक्त केला नाही. त्यानंतर मुंबईतील बहिणीलाही चौकशीस बोलाविले. मात्र त्या दिल्लीला होत्या. वेळोवेळी संपर्क साधूनही त्यांच्या प्रतिसाद मिळाला नाही. कुणाला तपासाबाबत संशय असल्यास त्यांनी लिखित द्यावे, असे सिंग म्हणाले. बिहार पोलिसांनी आमच्याशी संपर्क केला होता, मात्र ते त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन चौकशी करत आहेत. त्यांनी नियमानुसार गुन्हा आम्हाला वर्ग करायला हवा होता. सध्या ते कुठल्या कायद्यांतर्गत एक्स्ट्रा टेरिटोरियल तपास करत आहेत, हे माहिती नाही. याबाबत कायदेशीर सल्ला मिळताच, पुढील कारवाई करू. कुठलीही कागदपत्रे बिहार पोलिसांना दिली नाहीत. तपासाचे सर्व अधिकार स्थानिक पोलिसांना आहेत. त्यानुसार आमचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे सिंग म्हणाले.
नियमानुसारच केले क्वारंटाइन
मुंबईत चौकशीसाठी आलेले पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई पालिकेने होम क्वारंटाइन केले. याबाबत जास्त न बोलता मुंबईत बाहेरून कोणी आले तर नियमानुसार क्वारंटाइन होणे बंधनकारक असल्याचे सिंग म्हणाले.
आत्महत्येपूर्वी बायपोलर डिसॉर्डरबद्दल सर्चिंग
दिशाच्या आत्महत्येशी संबंध जोडल्याने सुशांत तणावात होता. सोशल मीडियावर सुरू झालेल्या चर्चांमुळे अवस्थ होता. याच दरम्यान बायपोलर डिसॉर्डर, स्किझोफ्रेनियासारख्या आजारांबद्दल तो गूगलवर सातत्याने सर्च करत असल्याचे पुरावे सापडले आहेत, असे सिंग यांनी सांगितले.
रियाच्या खात्यात थेट पैसे ट्रान्सफर केले नाहीत
सुशांतच्या खात्यात १८ कोटी होते. त्यापैकी साडेचार कोटी अजूनही खात्यात आहेत. त्याच्या खात्यातून रिया चक्रवर्तीच्या खात्यात थेट पैसे ट्रान्सफर झाल्याचे समोर आलेले नाही. याबाबत अधिक तपास सुरू आहेत. रियाचा दोनदा जबाब नोंदवला आहे. पोलीस ठाण्यातही अनेकदा तिला बोलावले. सध्या ती कुठे आहे, याबाबत माहिती देऊ शकत नसल्याचे सिंग म्हणाले.
दिशाच्या पार्टीत राजकीय नेते नव्हते
सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियनने आत्महत्येपूर्वी आयोजित केलेल्या पार्टीत काही राजकीय नेते उपस्थित असल्याच्या चर्चांमुळे या प्रकरणाशी राजकीय कनेक्शन जोडण्यात येत आहे. त्यातच दिशाच्या आत्महत्येनंतर काही दिवसांनीच सुशांतनेही आत्महत्या केली. याबाबत सिंग यांनी सांगितले की, ‘दिशाच्या होणाºया पतीच्या घरी ८ जूनला पार्टी होती. पार्टीत भावी पतीसह आणखी चौघे होते. त्यांचे जबाब नोंदविले आहेत. सीसीटीव्हीही तपासले. पार्टीत कोणतेही राजकीय नेते नव्हते.
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ठेवणार तपासावर लक्ष - विनय तिवारी
सुशांत प्रकरणाच्या चौकशीवर लक्ष ठेवण्यासाठी रविवारी बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी मुंबईत दाखल झाले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या पी दक्षिण विभागाने त्यांना गोरेगावमधील एसआरपीएफ विश्रामगृहात १४ दिवस क्वारंटाइन केले. त्यामुळे पाटणा पोलिसांच्या पथकाकडून सुरू असलेल्या तपासावर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लक्ष ठेवणार असून वरिष्ठांना वेळोवेळी माहिती देणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले. दरम्यान, तिवारी यांना मुंबईत दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये राहायचे होते. मात्र, कोरोनामुळे आॅफिसर्स मेस कार्यरत नाही. त्यामुळे त्यांना एसआरपीएफ विश्रामगृहात थांबविल्याची माहिती महाराष्टÑ पोलिसांनी दिली.