Join us

मुंबई पोलिसांचा हिसका; लघुशंकेच्या बहाण्याने पळालेल्या मोक्का आरोपींच्या मुसक्या आवळल्या!

By पूनम अपराज | Published: July 09, 2018 8:33 PM

पोलिसांच्या डोळ्यात माती फेकून 'मोक्का'च्या दोन आरोपींनी काढला पळ 

- पूनम अपराज 

आज सीएसएमटी येथील किल्ला कोर्टात सुनावणीसाठी मोक्का कायद्यान्वये अटक दोन आरोपींना हजर करण्यासाठी आणले होते. दरम्यान, पोलिसांच्या डोळ्यात माती फेकून दोनही आरोपी पळ काढण्यात यशस्वी झाले. मात्र, मुंबई पोलिसांनी हिसका दाखवत भर पावसातही फरार आरोपींना जेरबंद केले. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात या दोन आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम ३५३, २२४, ३३२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अली अब्बाज खान (वय - २९) आणि राज शेषराज चौहान उर्फ सुनील (वय - २५) या दोन आरोपींनी पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेक करत पळ काढला होता. या दोन आरोपींनी लघुशंकेच्या बहाण्याने जाऊन झाड्याच्या कुंडीतील माती मुठीत घेऊन आले आणि सोबत असलेल्या पोलिसांच्या डोळ्यात ती माती फेकून फरार झाले. आज संबंध दिवस मुंबईत पावसाचा कहर होता, तरी या आरोपींना पकडणे जिकीरीचं काम होतं. तरीदेखील मोठ्या शिताफीने पोलिसांनी भरपावसात फरार आरोपींचा मग काढत एकास प्रेस क्लबजवळून तर दुसऱ्यास सीएसएमटी रेल्वे स्थानकासमोरून मुसक्या आवळल्या आहेत. हे फरार आरोपी मुसळधार पावसात पळ काढण्याच्या बेतात होते. परंतु, जिगरबाज पोलिसांनी त्यांचा हा कट उधळला आहे. 

टॅग्स :मुंबईअटकपोलिस