तीस वर्षांच्या मॉडेलने बॉलिवूड निर्माता तसेच टी- सीरिज संगीत कंपनीचा मालक भूषण कुमार याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. माझ्याशी मैत्री करून प्रोजेक्टमध्ये काम मिळवून देतो असे सांगत त्याने बलात्कार केला आणि त्याचे व्हिडीओ शूटिंग करत पुन्हा लैंगिक अत्याचार केल्याचे या मॉडेलचे म्हणणे आहे. त्यानुसार डीएननगर पोलिसांनी
त्याच्याविरोधात बलात्कार आणि संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मॉडेलने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, २८ सप्टेंबर, २०१७ मध्ये सांताक्रुझच्या जे डब्लू मॅरियेट हॉटेलमध्ये तिची भूषण कुमारशी ओळख झाली. तेव्हा काही काम असल्यास मला सांगा असे तिने त्याला सांगितले आणि त्याने स्वतःचा खासगी मोबाइल क्रमांक मॉडेलला दिला. त्यानुसार २९ सप्टेंबरला तिने कुमारशी संपर्क साधला तेव्हा त्याने तिला तिचे फोटो व्हॉटसॲपवर पाठवायला सांगितले. ३० सप्टेंबरला भूषणने तिला २२ अलमॉड या त्याच्या बंगल्यावर कामाबाबत चर्चा करण्यासाठी बोलावले; मात्र तिने आपण ऑफिसमध्येच भेटू अशी विनंती केली.
अखेर १४ ऑक्टोबर रोजी कुमारने तिला भवन्स कॉलेजजवळ भेटायला बोलावले. ती तिच्या कारने पोहोचली तेव्हा कुमार आधीच तिथे हजर होता. तिने त्याच्या कारच्या मागोमाग जात अखेर कुमारच्या सांगण्यानुसार राजहंस कॉलेजजवळ तिची कार पार्क केली. त्यानंतर तिला स्वतःच्या कारमध्ये बसायला सांगत लवकरच येणाऱ्या नव्या प्रोजेक्टमध्ये तिला काम देण्याचे आश्वासन देत विश्वासात घेतले. त्यानंतर स्वतःसोबत भवन्स कॉलेजजवळील २२ अलमॉड या घरातील पहिल्या मजल्यावरील खोलीत घेऊन गेला. ‘फिल्म इंडस्ट्री में आना हैं तो आपको कॉम्प्रमाइज करके सेक्सुअल फेवर करना पडेगा’ असे म्हणत त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच या सगळ्यांचे त्याने व्हिडिओ शूट करत नंतर ते तिचे नातेवाईक व मित्रमंडळीत व्हायरल करण्याची तसेच तिचे करिअर बर्बाद करण्याची धमकी देत तिला पुन्हा राजहंस कॉलेजजवळील तिच्या कारकडे आणून सोडले, असे तिने म्हटले आहे.
तो मोठा चित्रपट व्यावसायिक असल्याने त्याच्याविरोधात कोणीच काही करणार नाही या भीतीने ती तणावात गेली आणि आत्महत्या करण्याचे विचार तिच्या मनात येऊ लागले. अखेर एका कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी म्हणून काम करू लागली. तिच्या मित्रांनी तिला हिंमत दिली आणि तिने पोलीस ठाण्यात जाऊन कुमारविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, डीएननगर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार चौकशी करत आहेत.
मॉडेलकडे आरोपीविरोधात पुरावेभूषणकुमार याने मॉडेलला स्वतःच्या बंगल्यात बोलावले तेव्हाचे कार आणि त्याच्या घरातील व्हिडिओ तिने त्याच्या नकळत रेकॉर्डिंग करून ठेवले आहेत. त्यानुसार त्याच्याविरोधात तिच्याकडे भक्कम पुरावे असल्याचा दावा तिने केला आहे.
भूषणकुमारवरील आरोपात तथ्य नाहीभूषणकुमार यांच्या विरोधात करण्यात येणाऱ्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून, या महिलेने टी- सीरिजच्या फिल्म आणि व्हिडीओमध्ये याआधी काम केले आहे, असे टी - सीरिज कंपनीच्या अधिकृत प्रवक्त्याकडून सांगण्यात आले आहे.