मुंबई : गृहमंत्रालयाने केलेल्या बदल्यांनंतर मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. यात एकूण १८ उपायुक्तांना नवीन जबाबदारी सोपविण्यात आली. यापूर्वी रंगलेल्या नाराजी नाट्यातील उपायुक्तांच्या बदलीचाही यात समावेश असून त्यांच्या बदलीचे ठिकाण अद्याप दाखविण्यात आलेले नाही.
मुंबई पोलीस दलातील परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त शशिकुमार मीना यांच्यावर महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या परिमंडळ एकची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी कृष्णकांत उपाध्याय यांची नेमणूक करण्यात आली. परिमंडळ ४ ची धुरा विजय पाटील यांच्याकडे तर, परिमंडळ १० ची जबाबदारी एम. सी. व्ही. महेश रेड्डी यांच्याकडे सोपविली आहे. एस. चैतन्य हे अभियान विभागाचे नवीन उपायुक्त असतील. तर, डॉ. राजू भुजबळ यांच्याकडे गुन्हे शाखेची (अंमलबजावणी) आणि प्रकाश जाधव याच्याकडे गुन्हे शाखा (प्रकटीकरण)ची जबाबदारी देण्यात आली आहे.
गुन्हे शाखा प्रतिबंधक विभागाचे दत्ता नलावडे यांच्या खांद्यावर अंमली पदार्थ विरोधी पथकाची जबाबदारी असेल, तर तर गुन्हे प्रकटीकरणचे नंदकुमार ठाकूर आणि सशस्त्र पोलीस दल मरोळचे सोमनाथ घार्गे यांची वाहतूक विभागात बदली करण्यात आली.तसेच पोलीस उपायुक्त योगेश कुमार गुप्ता यांची वाहतूक विभागात तर संजय पाटील यांची मुख्यालय २ आणि एस. टी. राठोड यांचीविशेष शाखा १ मध्ये नेमणूक करण्यात आली. जलद प्रतिसाद पथकात भरत तांगडे तर सशस्त्र पोलीस दल, ताडदेव येथे विनायक ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ताडदेवचे मोहन दहिकर यांची सशस्त्र पोलीस दल नायगाव येथे बदली करण्यात आली आहे. परिमंडळ ४ पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांची सरंक्षण विभागात तर, विशेष शाखा १ चे शहाजी उमाप यांची सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे.