राणांचा पाय आणखी खोलात? 'तो' आरोप महागात पडण्याची शक्यता; पोलीस लागले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 05:20 PM2022-04-26T17:20:14+5:302022-04-26T17:22:21+5:30

मुंबई पोलीस आयुक्तांच्या ट्विटनंतर पोलीस दलात वेगवान हालचाली; राणा आणखी अडचणीत येण्याची शक्यता

mumbai police might register complaint against mp navneet rana for false allegations | राणांचा पाय आणखी खोलात? 'तो' आरोप महागात पडण्याची शक्यता; पोलीस लागले कामाला

राणांचा पाय आणखी खोलात? 'तो' आरोप महागात पडण्याची शक्यता; पोलीस लागले कामाला

googlenewsNext

मुंबई: पोलीस कोठडीत मला पाणीही देण्यात आलं नाही, असा गंभीर आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणांकडून करण्यात आला होता. मात्र पोलीस आयुक्त संजय पांडेंनी राणा दाम्पत्याचा एक व्हिडीओ ट्विट केला. त्यात नवनीत राणा आणि रवी राणा पोलीस ठाण्यात बसून चहा पित असल्याचं दिसत आहे. त्यानंतर आता पोलीस दलात वेगवान हालचाली सुरू आहेत. पोलिसांवर आरोप करणाऱ्या राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अनुसूचित जातीची असल्यानं मला पाणी दिलं नाही, वॉशरुमही वापरू दिलं नाही, असे गंभीर आरोप राणांनी केले. यासंदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवलं. मात्र राणांचा आरोप खोटा असल्याचं पोलीस आयुक्त संजय पांडेंच्या ट्विटवरून दिसत आहे. त्यामुळे आता पोलिसांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी राणा यांच्याविरोधात तक्रार दाखल होऊ शकते. तशी तयारी पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे राणा यांच्याविरोधात तक्रार नोंदवून घेणारे आणि तक्रार देणारे पोलीस अधिकारी एकाच जात प्रवर्गातील असणार आहेत. त्यामुळे राणा यांच्याविरोधात लवकरच नवा गुन्हा दाखल होईल. राणा यांनी केलेल्या आरोपांनंतर लोकसभा अध्यक्षांनी राज्य सरकारकडे अहवाल मागितला. त्यासाठी सरकारला २४ तासांची मुदत देण्यात आली. लोकसभा अध्यक्षांनी मागितलेला अहवाल लवकरच राज्य सरकारकडून पाठवण्यात येणार आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांकडून राणांचा व्हिडीओ ट्विट
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी राणा दाम्पत्याचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. राणा दाम्पत्याला शनिवारी अटक झाली. त्यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्यावेळचा व्हिडीओ पांडेंनी शेअर केला आहे. त्यात राणा दाम्पत्य चहा पिताना दिसत आहे. 'आम्ही अधिक काही बोलायची गरज आहे का?' असं पांडेंनी ट्विटसोबत म्हटलं आहे. त्यामुळे राणा यांनी पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपांमध्ये किती तथ्य आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Web Title: mumbai police might register complaint against mp navneet rana for false allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.