मुंबई पोलिसांची 'ती' चूक अन् वाचला दाऊद; अजित डोवाल मीरा बोरवणकरांवर का भडकले?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 02:42 PM2023-11-02T14:42:56+5:302023-11-02T14:44:07+5:30
२०१५ मध्ये एका मुलाखतीत माजी गृह सचिव आरके सिंह यांनी म्हटलं होते की, मुंबई पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांमुळे दाऊद वाचला. दाऊदला संपवण्याच्या या कटात अजित डोवालही सहभागी होते.
मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आजही भारतीय तपास यंत्रणांच्या हिटलिस्टवर आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दाऊदला संपवण्याचा प्लॅन पूर्णपणे तयार केला होता परंतु मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळे तो वाचला. माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिश्नर’ पुस्तकात या घटनेचा गौप्यस्फोट केला आहे.
मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलंय की, मुंबई पोलीस दलातील अधिकारी दाऊदच्या संपर्कात होते हे म्हणणं चुकीचे आहे. तर पोलीस आणि आयबी यांच्यातील गैरसमजुतीमुळे दाऊद इब्राहिमला संपवण्याचा डाव अयशस्वी झाला. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात दाऊद इब्राहिमला मारण्याचा प्लॅन आयबीने बनवला होता. पण मुंबई पोलिसांची एक चूक नडली आणि संपूर्ण प्लॅन उद्ध्वस्त झाला. २०१५ मध्ये एका मुलाखतीत माजी गृह सचिव आरके सिंह यांनी म्हटलं होते की, मुंबई पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांमुळे दाऊद वाचला. दाऊदला संपवण्याच्या या कटात अजित डोवालही सहभागी होते.
दाऊदच्या मुलीच्या लग्नात होणार होता हल्ला
२००५ मध्ये दाऊद इब्राहिम दुबईत त्याची मुलगी माहरुखचं लग्न पाकिस्तान क्रिकेटर जावेद मियादादची करणार होता. गुप्तचर यंत्रणेला ही माहिती मिळताच दाऊदला तिथेच संपवण्याचा प्लॅन आखला गेला. तपास यंत्रणांनी छोटा राजन गँगच्या काही शूटर्सलाही या ऑपरेशनमध्ये सामावून घेतले. राजनने या कामासाठी २ शूटर्स पाठवले. त्यांचे नाव होते विकी मल्होत्रा आणि फरीद तनाशा, त्यावेळी मीरा बोरवणकरांच्या नेतृत्वात मुंबई पोलिसांच्या पथकाने मल्होत्रा आणि तनाशाला अटक करण्याची योजना आखली. राजनच्या फंटरची माहिती मिळताच उपायुक्त धनंजय कमलाकर यांच्या नेतृत्वात एक टीम दिल्लीसाठी रवाना झाली.
एका हॉटेलमध्ये अजित डोवाल मल्होत्रा आणि तनाशा यांच्याशी बोलत होते तेव्हाच मुंबई पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली. एका मुलाखतीत बोरवणकरांनी म्हटलं की, आयबी आणि मुंबई पोलीस यांच्यातील विसंवादामुळे हे घडलं. त्यामुळे मुंबई पोलीस दाऊदला मिळालेत हे बोलणे चुकीचे आहे. छोटा राजनकडून काही लोक बिल्डरला खंडणी मागण्यासाठी जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विकी मल्होत्रा हा कुणाशी तरी सर म्हणून बोलत होता. हा सर अखेर कोण होतं हे समोर आले नाही.
डीसीपी कमलाकर यांची फ्लाईट मिस झाली म्हणून पोलीस निरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वात पथक रवाना झाले. पाटील यांचा सामना विकी मल्होत्रा आणि एक अन्य व्यक्तीशी झाला जे स्वत:ला आयबीचे माजी सहसंचालक असल्याचे सांगत होते. त्यांनी दिल्ली पोलीस कंट्रोल रुमला फोन केला आणि ही बातमी माध्यमांमध्ये लिक झाली. आयबी अधिकाऱ्यांनी कुठले ऑपरेशन प्लॅन केले जातंय हे सांगितले नाही. मी महाराष्ट्राच्या आयबी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यांनाही कल्पना नव्हती. निवृत्तीनंतर अजित डोवाल एजेन्सीसोबत काम करतायेत हे माहिती नव्हते. या घटनेमुळे डोवाल मीरा बोरवणकर यांच्यावर भडकले. तुला धडा शिकवेन असं संतापून ते बोरवणकरांना म्हणाले.